राहुरी तालुक्यात 14 जणांना करोनाची बाधा

सात महिलांचा समावेश; राहुरीतही रुग्ण वाढले
राहुरी तालुक्यात 14 जणांना करोनाची बाधा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची राहुरी तालुक्यात पायमल्ली होत असून तालुका महसूल प्रशासन व आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने राहुरी तालुक्यात करोनाचा पुन्हा उद्रेक होत आहे.

दिवसागणिक आकडेवारी वाढत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. काल शनिवारी (दि.20) दिवसभरात 14 जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यात 7 महिलांचा समावेश आहे. गेल्या पाच दिवसात एकूण 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिक भयभीत झाले असून तालुक्यातील आरोग्य व महसूल प्रशासनाला याबाबत गांभीर्य नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

काल राहुरी शहरात 8 जणांना करोनाची बाधा झाली. त्यात 5 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे.(वय 42, 15, 9, 29, 30, 31 वर्ष व 3 महिला वय 62, 37, 29 वर्ष), मालुंजा खुर्द येथे 4 महिलांना (वय 60, 36, 19, 32 वर्ष) करोनाची बाधा झाली. तर राहुरी खुर्द येथे 27 वर्षाच्या पुरुषाला, राहुरी विद्यापीठात 23 वर्षाच्या पुरुषाला करोनाची बाधा झाली.

राहुरी शहरासह तालुक्यात नियम धाब्यावर बसविले जात असून शासकीय कार्यालये व विविध संस्थांमध्ये, शाळा व महाविद्यालयात नागरिकांसह अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांकडूनच जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची पायमल्ली होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com