राहुरी तालुक्यात करोना महामारीचे संक्रमण वाढले
सार्वमत

राहुरी तालुक्यात करोना महामारीचे संक्रमण वाढले

रुग्णसंख्या पोहोचली 34 वर; राहुरी, राहुरी फॅक्टरी, वांबोरीत लॉकडाऊन

Arvind Arkhade

राहुरी|प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यात करोना महामारीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत महसूल प्रशासनाच्या उदासीन असल्याने नागरिकांची नाराजीही वाढली आहे. राहुरी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने करोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राहुरी शहर आज सोमवार दि.20 जुलै ते गुरुवार दि. 23 जुलैपर्यंत चार दिवस कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याने या कालावधीत जीवनाश्यकसह सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

व्यापारी असोसिएशन पदाधिकारी यांच्या काल सकाळी झालेल्या बैठकीत राहुरी शहर बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख यांनी दिली. या पार्श्वभूमीवर कुणीही नियम मोडू नये, रस्त्यावर गर्दी अथवा मोकाटपणे फिरू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

शहरासह राहुरीच्या ग्रामीण भागात हळूहळू पाय पसरू लागलेल्या करोनाचा गुरूवारी सायंकाळी राहुरी शहरात शिरकाव झाल्याने एक युवक बाधित आढळला होता. त्यानंतर शनिवारी रात्री त्याच्या संपर्कातील दोघांना करोनाची बाधा झाल्याने शहरात करोनाबाधितांची संख्या तीनवर गेली. तर काल रविवारी दुपारी आलेल्या अहवालात पुन्हा एक पॉझिटिव्ह आढळून आल्याने राहुरी शहराची संख्या चार झाली, तर काल वांबोरीत एका खासगी डॉक्टरचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.

कात्रड येथील करोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्या डॉक्टरने इलाज केल्याने डॉक्टरही करोनाबाधित आढळून आल्याने वांबोरी शहर काल दि.19 जुलै रात्री बारा वाजेपासून दि.1 ऑगस्टच्या रात्री बारा वाजेपर्यंत लॉकडाऊन राहणार असल्याचे तालुका प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

राहुरी कारखाना परिसरातही करोना बाधितांची संख्या काल रात्रीपर्यंत सात झाल्याने राहुरी कारखाना परिसर काल रात्री बारा वाजेपासून दि. 1 ऑगस्टच्या रात्री बारा वाजेपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन राहणार आहे.

दरम्यान काल दुपारी 4 वाजेच्या तालुका आरोग्य विभागाच्या अहवालानुसार पुन्हा देवळाली प्रवरा-राहुरी फॅक्टरी परिसरात तीन व राहुरी शहरातील 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीत रुग्णसंख्या दहा तर राहुरी नगरपरिषद हद्दीत रुग्णसंख्या चार असून आजअखेर ग्रामीणसह शहरीभागाची एकूण बाधित रुग्ण संख्या 34 वर जाऊन पोहोचल्याने राहुरी तालुक्यात धोक्याची घंटा वाजू लागली आहे.

राहुरी शहरात 65 वर्षीय महिलेसह चिमुकलीला करोनाची बाधा

राहुरी|तालुका प्रतिनिधी|Rahuri

राहुरी शहरात दोन दिवसांपूर्वी एका व्यापार्‍याला करोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर काल दुपारी राहुरी शहरात मध्यवर्ती भागात राहणार्‍या एका महिलेलाही अशी लक्षणे दिसू लागल्याने तिला नगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाने उपचारासाठी दाखल केले आहे.

राहुरी शहरातील बाधितांमध्ये त्या बाधिताची 65 वर्षीय आई आणि दीड वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. सध्या या बाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले असून प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, प्रशासनाने आता पुन्हा कठोर उपाययोजना सुरू केल्या असून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. राहुरी नगरपालिका प्रशासनाने संक्रमण रोखण्यासाठी राहुरी शहराच्या काही भागात फवारणी करून रस्ते सील केले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com