राहुरी तालुक्यात करोनाचा पहिला बळी

राहुरी तालुक्यात करोनाचा पहिला बळी

राहुरी|प्रतिनिधी|Rahuri

राहुरी तालुक्यात करोनाचे संक्रमण वाढले असून काल देवळाली प्रवरा हद्दीतील एका रूग्णाचा मृत्यू झाला. तो रूग्ण राहुरी तालुक्यातील करोनाचा पहिला बळी ठरला आहे.

देवळाली येथील एकजण नऊ दिवसापूर्वी करोनाबाधित आढळला होता. त्याच्यावर नगर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार चालू होते. परंतु उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही.अखेर गुरूवारी सकाळी त्या रूग्णाने अखेरचा श्वास घेतला.

देवळाली प्रवरातील करोनाचा पहिला बळी गेला आहे. दि.21 जुलै रोजी देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अण्णासाहेब मासाळ यांनी त्या रूग्णास प्रथम कृषी विद्यापीठात स्त्राव घेण्यासाठी पाठविले.

स्त्राव घेतल्यानंतर सायंकाळी जिल्हा रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या रूग्णाच्या पाठोपाठ त्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले.

त्यामध्ये रूग्णाचा पुतण्या बाधीत निघाला होता. त्यावर उपचार करण्यात आले. उपचार घेऊन तो घरी आला आहे. करोनाचा बळी ठरलेल्या रूग्णाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी असा परिवार असून त्याचा अंत्यविधी महानगरपालिकेच्या पथकाने नगर येथील अमरधाममध्ये करण्यात आला.

देवळाली प्रवरा येथील करोनाबाधित रूग्ण नऊ दिवसाच्या उपचारानंतर त्याचे निधन झाल्याचे वृत्त देवळाली प्रवरात येऊन धडकले. मात्र, याबाबत राहुरी तालुका प्रशासन अनभिज्ञ आढळले. प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींनी दुपारी तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदींना भ्रमणभाषवर संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता वरील अधिकार्‍यांनी आम्हाला वरून कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे सांगून माहिती टाळण्याचा प्रयत्न केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com