
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील मिरी-तिसगाव पाणी योजना व राहुरी तालुक्यातील सोनगाव, धानोरे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी अनुक्रमे 155 कोटी व 27 कोटींच्या पाणी योजनेला तांत्रिक मान्यता मिळून लवकरच या योजना मार्गी लागतील व येथील जनतेच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूप सुटेल, अशी माहिती राज्याचे राज्यमंत्री राहुरी विधानसभेचे लोकप्रतिनिधी प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी सांगितले, विधानसभेत निवडून गेल्यावर पहिल्यांदा मंत्री नसतानाही मिरी-तिसगाव पाणी योजनेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत मिरी-तिसगाव सह 43 गावे व 186 वाड्या-वस्त्या समाविष्ट असलेली सर्व पुढील पंचवीस वर्षाची रूपरेषा ठरवून 155 कोटी 59 लाख रुपयांची परिपूर्ण पाणी योजनेस शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. पूर्वीच्या योजनेतून शंभर लिटर पाणी धरणातून गेल्यानंतर तिसगावपर्यंत केवळ 25 लिटर पाणी पोहोचत होते.
यामध्ये अनेक त्रुटी असल्याने मुळा धरण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या 26.5 किलोमीटर लांबीची पाइपलाईन जमिनीवरून घेण्याचा आग्रह आपण धरला होता. ज्यायोगे पाणी पूर्णदाबाने पोहोचण्यात अडचणी होणार नाहीत. पूर्वीच्या योजनेत नसलेली खांडगाव, जोहारवाडी, सातवड, कौडगाव, त्रिभुवनवाडी, निंबोडी, देवराई, घाटशिरस, करडवाडी, पवळवाडी, डमाळवाडी ही 12 गावे समाविष्ट करून परिपूर्ण योजना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी आपल्या कार्यालयातून जीएसडीए व इतर कार्यालयाचा पाठपुरावा करण्यात आला. अंतर्गत खराब जलवाहिन्या बदलण्याची कामे योजनेतून होणार आहेत.
या दोन्ही योजनांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीज पुरवठ्याचा प्रश्न निकाली काढण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. तिसगाव हे मोठ्या लोकसंख्येचे व्यापारी गाव असल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रापासून याच योजनेतून तिसगावसाठी स्वतंत्र पाईपलाईन प्रस्तावित आहे, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. या भागातील ज्येष्ठनेते काशिनाथ लवांडे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. उंबरे, ब्राह्मणीसह सहा गावांच्या पाणी योजनेत कोणताही सूक्ष्म अभ्यास न करता निवडणुकीच्या तोंडावर भूमिपुजन करण्यात आले होते. परंतु धरणावरून येणारी मुख्य जलवाहिनी एचडीपी पाईपची असल्याने या योजनेतील पूर्वीचे अंदाजपत्रक बदलून मुख्य जलवाहिनी जीआय पाईपची टिकाऊ घेण्यात आली असून अजून दोन गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
वांबोरी या मोठ्या गावच्या पाणीपुरवठा योजनेची टेंडर प्रक्रिया सुरू झालेली असून लवकरच या योजनेचे कामही मार्गी लागून वांबोरीकरांसह मतदारसंघातील बहुतांश गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचा योग्य तो प्रयत्न आघाडी सरकारच्या माध्यमातून सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.