राहुरी तालुक्यात ढगफुटीसदृष्य पाऊस

मुळा नदीपात्रात 15 हजार क्युसेस विसर्ग
राहुरी तालुक्यात ढगफुटीसदृष्य पाऊस

राहुरी |ता. प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील पच्छिमेकडील पठार भागात आज पहाटेच्या सुमारास ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. संपुर्ण राहुरी तालुक्यात बुधवारी मध्यरात्री पासुन विजांच्या कडकडांसह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. विजांचा पडणारा लख्ख प्रकाश व ढगांचा गडगडाटामुळे एखाद्या भयपटासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान राहुरी तालुक्यातील पच्छिमेकडील वरशिंदे, वाबळेवाडी, कोळेवाडी, म्हैसगाव व ताहाराबाद परिसरात ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने त्या परिसरातील लहान-मोठे बंधारे फुटल्याने कोळेवाडीला पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने काही कुटुंबाने सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. यापुराच्या पाण्यात काही रहिवाशांच्या जवळपास दिडशे ते दोनशे कोंबड्या वाहून गेल्या आहे. पुराच्या पाण्याने शेतमालाचे प्रंचड नुकसान झाले असून परिसरातील काही लहान पुलं वाहून गेल्याने अनेक वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. मंडलाधिकारी व तलाठ्यांनी येऊन परिस्थितीची पाहणी केली असल्याची माहिती कोळेवाडीचे सरपंच डॉ.जालिंदर घिगे यांनी सांगीतले.

दरम्यान तालुक्यातील खडांबे खुर्द येथील लेंडीच्या ओढ्याला पुर आल्याने तसेच राहुरी-मांजरी रस्त्यावर आरडगाव येथे झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतुक ठप्प झाली. तहसिलदार एफ.आर शेख यांनी तातडीने आरडगाव येथे एक पथक पाठवून रस्त्यावरील अडथळा दूर करून रहदारी सुरळीत केली आहे. त्याच प्रमाणे सर्वच शासकिय आधिकारी व कर्मचार्‍यांना कामाचे मुख्यालय न सोडण्याचे आदेश तहसिलदार यांनी दिले आहे.

या ढगफुटीसदृष्य पावसामुळे मुळाधरणात पाण्याची आवक वाढल्याने नदीपात्रात सकाळी 10 हजार क्युसेस तसेच दुपारी 3 वाजता 15 हजार क्युसेसचा विसर्ग वाढविण्यात आला असून नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे मुळानदीवरील काही पुलं पाण्याखाली गेल्याने काही गावांचा दळणवळणाचा संपर्क तुटला आहे. धरणातील येणार्‍या पाण्याच्या परिस्थितीनुसार विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अभियंता सायली पाटिल यांनी सांगीतले आहे.

देवळाली प्रवरा येथे ढगफुटी सदृष्य पाऊस सुरु असतांना विजांचा प्रचंड कडकडाट सुरु होता. यामध्ये पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास रवींद्र ढुस यांच्या वस्ती वरील नारळाच्या झाडावर प्रचंड आवाज करीत विज पडल्याने नारळाचे झाड जळून खाक झाले. पाऊस सुरु असल्याने सुदैवाने सर्वजण घरात होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com