राहुरी तालुक्यात बंद केलेली बससेवा सुरू करा

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या आगार प्रमुखांना सूचना
राहुरी तालुक्यात बंद केलेली बससेवा सुरू करा

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांनी गेल्या 8 दिवसांपासून बसेस बंद झाल्याच्या अनेक तक्रारी आ. प्राजक्त तनपुरे यांना समक्ष भेटून मांडल्याने त्याबाबत विचारणा करण्यासाठी आ. तनपुरे यांनी बस स्थानकात जाऊन श्रीरामपूर विभागाचे आगार प्रमुख व इतर अधिकार्‍यांची भेट घेऊन सदर बसेस लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या.

आ. तनपुरे यांना मतदार संघात फिरताना तालुक्यातील उंबरे, वांबोरी, खडांबे, चिंचाळे, आदी भागातील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी समक्ष भेटून गेल्या 8 दिवसांपासून आम्हाला शाळेत व महाविद्यालय येथे जाण्यासाठी बसेस येत नाही, आल्या तर वेळेवर येत नसल्याने आमची मोठी गैरसोय होत आहे. तसेच खडांबे परिसरातील विद्यार्थ्यांना बसेस न आल्यास पायी चालत वांबोरी फाटा, नगर मनमाड राज्य मार्गावर जाऊन बसेस पकडाव्या लागतात. असे सांगताना हा प्रकार आमदार तनपुरे यांनी पाहिला असल्याने त्यांनी काल थेट बस स्थानकात येऊन विद्यार्थ्यांच्या समस्या श्रीरामपूरचे आगार प्रमुख श्रीमती कुटे, राहुरीचे बस स्थानक प्रमुख अशोक पटारे यांना सांगितल्या.

या बसेस बंद होण्याचे किंवा उशिरा का येतात याबाबत विचारणा केली असता, महामंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, गणेशोत्सवासाठी शासनाने अनेक बसेस कोकणातील नागरिकांसाठी पाठवल्या असून त्यामुळे काही बसेसच्या फेर्‍या कमी करण्यात आल्या आहेत. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील काही बसेस सुरू आहेत. कोविड पूर्वी ज्या ज्या मार्गावरून बसेस सुरू होत्या त्या पूर्ववत सुरू केल्या आहेत. त्यात काही बसेस इतर आगरातील असल्याने त्यांनी त्या बंद केल्या होत्या. त्या सर्व बसेस दोन दिवसांत पूर्ववत सुरू होतील.

राहुरीच्या बस स्थानकाची जी दुरवस्था झाली आहे. त्याची पहाणी करून किती बसेस येतात, किती प्लॅटफॉर्म आहेत, याची चौकशी करून अधिकार्‍यांकडून माहिती घेतली. बस स्थानकाच्या इमारतीसाठी व प्रवाशांना मिळणार्‍या सुविधांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून वरिष्ठ अधिकार्‍यांशी बैठका घेऊन बस स्थानकाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आली. राहुरी बस स्थानकाच्या कामाची निविदा लवकरच निघणार असून त्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार असल्याचे त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सांगितले. या निधीतून काम सुरू होईल.

बस स्थानक परिसरातील दुरावस्थेची पाहणी करून बस स्थानक आवारात रात्री पूर्ण अंधाराचे साम्राज्य असल्याच्या तक्रारी रिक्षा चालक व अनेक प्रवाशांनी मांडल्या असता आगार प्रमुख यांनी तातडीने वीजपुरवठा सुरळीत केला जाईल असे सांगितले. तसेच बस स्थानक आवारात अस्वच्छता पसरली असून त्याबाबत एसटीच्या अधिकार्‍यांनी सांगितले की अनेक व्यापारी स्थानक परिसरात घाण केरकचरा आणून टाकत असल्याने प्रचंड दुर्गधी पसरली आहे. त्याबाबत आ. तनपुरे यांनी राहुरी नगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांना साफसफाईच्या सूचना केल्या. यावेळी एसटीचे अधिकारी श्री. कासार, श्रीरामपूरचे आगार स्थानक प्रमुख श्री.पठारे राहुरीचे स्थानक प्रमुख अशोक पटारे, संदीप सोनवणे, ज्ञानेश्वर जगधने, विश्वास पवार, भाऊसाहेब कोहकडे, बाळासाहेब लटके, अमोल हरिश्चंद्रे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com