
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी शहर व तालुक्यात बिंगो जुगाराचे पेव फुटले असून, या जुगारामुळे अनेक प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत. तरूणाई या जुगाराच्या विळख्यात सापडल्याने पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
राहुरी पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे बिंगो जुगार शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू आहे. नव्यानेच रूजू झालेले पोलीस निरीक्षक हा बिंगो जुगार बंद करण्यास अपयशी ठरल्याचा आरोप नागरीकांमधून होत आहे.
बिंगो नावाचा जुगार हा झटपट जुगार असून, दिवसाला लाखोंची उलाढाल होत असल्याने पोलीस खाते जाणून बुजून दर्लक्ष करीत आहे. या जुगाराचे आयडी सुद्धा महाग स्वरुपात विकल्या जातात. राहुरी शहरामध्ये बिंगो जुगाराचे बर्याच आयडी विकल्या गेल्या आहेत.
बिंगो व ऑनलाईन सायबर जुगाराची सर्व गुन्हेगारी संघटित स्वरूपाची आहे. पोलीसांच्या आशिर्वादाने जुगार सर्रास सुरु आहे. बिंगो जुगार चालकांचे पोलीसांशी ‘लागेबांधे’ असल्याने हा गोरखधंदा शाळा व महविद्यालयाच्या हाकेच्या अंतरावर बिनधास्त सुरू आहे. या ऑनलाईन जुगाराची तरूणांमध्ये क्रेझ वाढत असून लाखो रुपये गमावून तरूणाई कर्जबाजारी होऊन चांगल्या घरातील मुले या खेळामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत असल्याचे दिसून येत आहे.
मागील महिन्यात राहुरी शहरातील एका तरूणाने आत्महत्या केली होती. त्या तपासात एका बिंगो चालकाचे नाव आले होते. तरीही राहुरी पोलीसांनी याचा गांभिर्याने विचार केला नसून या घटनेचा तपास मात्र, कासवगतीने सुरू आहे. या तरूणाचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला व चौकशीची मागणीही केली. परंतु, सर्व काही गुलदस्त्याच राहीले. या जुगाराला तत्कालीन पोलीस निरीक्षक दराडे यांनी चांगलाच लगाम घातला होता. मात्र, नवे आधिकारी राहुरीतील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती योग्य दिशेने हाताळण्यास असमर्थ असल्याने त्यांची बदली करून तालुक्याला एक ‘डॅशिंग’ अधिकारी द्यावा,अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.