
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी शहरातील एका एटीएममध्ये दोन अज्ञात भामट्यांनी हात चलाखी करून एटीएम कार्डची अदलाबदल केली. नंतर त्या एटीएम कार्डवरून वेगवेगळ्या ठिकाणांहून सुमारे अडीच लाख रुपये काढून घेण्यात आले. ही घटना दि. 28 एप्रिल ते 2 मे या दरम्यान घडली आहे.
परसराम तुळशीराम साखरे, वय 45 वर्षे, राहणार गोटूंबे आखाडा, ता. राहुरी यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 28 एप्रिल रोजी दुपारी सव्वाबारा वाजे दरम्यान परसराम साखरे हे राहुरी शहरातील बसस्थानक समोरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी त्यांना दोन भामटे भेटले. त्यांनी बोलबच्चन करून परसराम साखरे यांचे लक्ष विचलित केले. त्यानंतर हात चलाखी करून एटीएम कार्डची अदलाबदल केली.
साखरे यांचे एटीएम कार्ड घेऊन त्यांना सचिन हरिभाऊ डहाळे नावाचे एटीएम कार्ड दिले. त्यानंतर त्या दोन भामट्यांनी दि. 28 एप्रिल ते 2 मे दरम्यान साखरे यांच्या एटीएम कार्डवरून वेगवेगळ्या ठिकाणांहून 2 लाख 54 हजार 498 रुपये काढून घेतले आणि साखरे यांची फसवणूक केली.
हा प्रकार साखरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
साखरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत दोन अज्ञात भामट्यां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील हे करीत आहेत.