आरडगावच्या पोटनिवडणुकीतून होणार 'शितावरून भाताची परीक्षा'

बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी प्रयत्नशील तर निवडणुकीसाठी विरोधकांचा आग्रह
आरडगावच्या पोटनिवडणुकीतून होणार 'शितावरून भाताची परीक्षा'

आरडगाव l राजेंद्र आढाव

तीन अपत्य असल्याचा ठपका ठेवून राहुरी तालुक्यातील आरडगाव ग्रामपंचायतीच्या नानासाहेब मनोहर म्हसे यांना सदस्यपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे आता सदस्यपदाच्या एका रिक्त जागेसाठी आरडगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये पोटनिवडणूक होत आहे.

डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक रवींद्र म्हसे व नानासाहेब म्हसे यांच्यात लढत झाली होती. त्यात रवींद्र म्हसे यांचा पराभव झाला. तर नानासाहेब म्हसे हे सदस्यपदी निवडून आले. दरम्यान, ही लढत थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेली. रवींद्र म्हसे यांनी नानासाहेब म्हसे यांना तीन अपत्य असल्याचा आरोप करीत त्यांचे सदस्यपद रद्दबातल ठरविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यावर दीड वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी नानासाहेब म्हसे यांचे पद रद्दबातल ठरविले. त्यामुळे आता रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे.

दरम्यान, दि. २१ डिसेंबर रोजी ही निवडणूक होत असून त्यासाठी अनेक इच्छुकांनी जोरदार जय्यत राजकीय तयारी सुरू केली आहे. किमान पुढील दहा महिने तरी सदस्यपदासाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांनी आपआपल्या मंडळाच्या श्रेष्ठींकडे ‘वशिला' लावण्यास सुरूवात केली आहे. निवडून येणाऱ्या नूतन सदस्याला किमान दहा महिने सत्तेची संधी मिळणार आहे.

या निवडणुकीतून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही संभाव्य पंचवार्षिक निवडणुकीचा कौल समजणार आहे. मात्र, निवडणूक न होता ती बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी मंडळाच्या पडद्याआडून राजकीय हालचाली सुरू आहेत. तर निवडणूक झालीच पाहिजे, याबाबत विरोधी मंडळ आग्रही आहे. पोटनिवडणुकीत आपला उमेद्वार पडला 'तर? त्याची धास्ती सत्ताधाऱ्यांना पडली आहे. पोटनिवडणुकीत जनतेचा कौल कोणाला? हा धसका दोन्ही गटाला बसला आहे.

पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवाराची वर्णी लागली तर संभाव्य सार्वत्रिक निवडणूक लढविण्यास सोप्या जाणार असल्याचे गणित विरोधकांनी मांडले आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या यश-अपयशावरच दोन्हीही गटाचे राजकीय भविष्य अवलंबून राहणार असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकही त्याची राजकीय गोळाबेरीज करून राजकीय समिकरणांची पुढील ​जुळवाजुळव करणार आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक म्हणजे 'शितावरून भाताची परीक्षा' अशीच राहणार असल्याचे राजकीय संकेत आहेत.

आरडगावमध्ये एका जागेसाठी मोठी रस्सीखेच राहणार आहे. ग्रामपंचायतीत सध्या राष्ट्रवादीप्रणित जनसेवा मंडळ व भाजपाप्रणित ग्रामविकास मंडळ यांच्यात पुन्हा पोटनिवडणुकीत चुरस बघायला मिळणार आहे. आरडगांव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक दि. ७ ऑक्टोबर २०१७ साली जनसेवा मंडळ व ग्रामविकास मंडळ यांच्यात दुरंगी लढत झाली. जनसेवा मंडळ १० तर ग्रामविकास मंडळाचे २ असे एकूण १२ सदस्य निवडून आले होते. जनसेवा मंडळ व ग्रामविकास मंडळ यांच्यात दुरंगी लढत होऊन जनसेवा मंडळाचे कर्णा जाधव सरपंचपदी आरूढ झाले. तर सदस्यपदी सुनील मोरे, सहादू झुगे, भारत झुगे, मच्छिंद्र बर्डे, धनश्री जाधव, आशा जाधव, कुसुम झुगे, आशा वने, राणी म्हसे, मंगल जाधव असे नानासाहेब म्हसे वगळता एकूण ११ सदस्य आहेत. तर आता एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com