
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
निळवंडे धरणाच्या सार्या अंडरपास तसेच पुलांची कामे विनाखंड जोरात सुरू असून येणार्या वीस दिवसात संगमनेर व राहुरी तालुक्यामधील बोगद्याचे काम पूर्णत्वास जाऊन या कामातील मोठा टप्पा पार पडेल, यासाठी ठेकेदाराला 20 दिवसाची मुदत देण्यात आली असून येणार्या वर्षभरात राहुरी तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्रातील सर्व भागात निळवंडेचे पाणी येण्यासाठी आघाडी शासनाकडून प्रयत्न सुरू असून सर्वांच्या प्रयत्नातून ही स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात येईल, असा विश्वास राज्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.
निळवंडे धरणाच्या बोगद्याचे सुरू असलेले काम व तसेच इतर कामांची नामदार तनपुरे यांनी संबंधीत अधिकार्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून सर्व कामांचा आढावा घेतला यावेळी पत्रकारांना दिलेल्या माहितीत त्यांनी सांगितले की, कोरोना सारख्या महामारीच्या काळात राज्याच्या उत्पन्नावर मर्यादा येऊनही महाविकास आघाडी शासनाने या कामासाठी निधी कमी पडू दिला नाही. निधीअभावी कोणतेही कामे बंद राहिली नाही. मागील सरकारने पाच वर्षाच्या कार्यकाळात तीनशे कोटीच्या आसपास रक्कम या कामांसाठी दिली होती. परंतु आपले सरकार आल्यानंतर जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे मोठे सहकार्य या कामासाठी होत आहे.
आपल्या शासनाच्या काळात जवळपास वर्षाला तीनशे कोटी प्रमाणे तीन वर्षात 900 कोटी रुपयांचा निधी या कामासाठी उपलब्ध झाला असून या कालव्याच्या मार्गातील राहुरी तालुक्यातील लाभक्षेत्रातील 52 पैकी जवळपास पन्नास अंडरपास पूर्ण झाले आहे. आराखड्यात नसताना या भागातील काही गावातील लाभधारकांच्या मागणीनुसार पुलांची कामे मंजूर करून पूर्णत्वास गेलेली आहे. काही ठिकाणी वन विभागाच्या जमिनीत घेऊन जाणार्या कालव्या बाबतचा अडचणी होत्या. परंतु आपण स्वतः वन विभागाचे महसूलचे व पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांचे सह संयुक्त बैठक घेऊन या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
येत्या आठवड्यात वन विभागाच्या अडचणी दुर होऊन या भागातील जाणारी कामे त्वरित सुरू होतील राहुरी नगर परिषद हद्दीतील कामांबाबत तेल पर्यंतच्या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या वर्षभरात निळवंडेचे पाणी प्रत्यक्षात लाभ क्षेत्रात येण्यास अडचण येऊ नये, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मागील लोकप्रतिनिधीप्रमाणे निळवंडेचे पाणी वर्षभरात आणल्याशिवाय या भागात पाऊल ठेवणार नाही, अशा वल्गना व भूलथापा देण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष काम कसे पूर्ण होऊन हा शिवार फुलण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
आपली बांधिलकी शेतकर्यांशी असून आजही अधिकार्यांना बोगद्याच्या कामासाठी 21 दिवसांची मुदत देताना स्वतः जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील यांची भ्रमण ध्वनीवरून अधिकार्यांशी चर्चा घडवून आणली आहे. या कामासाठी वारंवार जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्यासह मुंबईत बैठक घेऊन अडीअडचणी दूर केले आहे. विशेष बाब म्हणून या कामासाठी निधी कमी पडू दिला नाही अशीही माहिती त्यांनी दिली.
यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता प्रमोद माने, उपअभियंता आसिफ शेख, वन विभागाच्या सुवर्ण माने, तहसीलदार माधुरी भोसले, पुनम दंडीले आदी अधिकार्यांसह सुयोग नालकर, किशोर गागरे, अनिल घाडगे, सोपान हीरगळ, अमोल भनगडे आदींसह मोठ्या संख्येने लाभक्षेत्रातील कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.