राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी कासार

राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी कासार

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी नगरपालिकेच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवशी प्रभाग 4 मधून निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक अनिल यशवंतराव कासार यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात येऊन तो मंजूर करण्यात आला होता. काल कासार यांच्या निवडीची घोषणा होणे ही औपचारिकता होती. नगराध्यक्षपदी कासार यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दयानंद जगताप यांनी घोषीत केले.

कासार यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद, उपनगराध्यक्षपद उपभोगले असून ते गेली अनेक वर्ष नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. त्यांच्या या निवडीचे जनसेवा मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार प्रसाद तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, माजी नगराध्यक्षा डॉ. सौ. उषाताई तनपुरे, ओजस्विनी पतसंस्थेच्या संस्थापक सुजाता तनपुरे यांनी अभिनंदन केले. दरम्यान, कोव्हिडमुळे राज्यात सध्या लॉकडाऊन असल्याने कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी व राज्यमंत्री यांच्या सूचनेवरून घेण्यात आला.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष कासार यांचा प्रांताधिकारी दयानंद जगताप व उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी यांनी सत्कार केला. कासार यांच्या निवडीबद्दल त्यांचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अभिनंदन केले. मुख्याधिकारी डॉ. कुरे यांनी नूतन नगराध्यक्ष व प्रांताधिकारी जगताप यांचा सत्कार केला. यावेळी कार्यालयीन अधीक्षक सुनील फडके यांनी नगराध्यक्ष निवडणुकीची पद्धत सांगितली.

नगरपालिकेच्या मावळत्या नगराध्यक्षा अनिता पोपळघट यांच्या कारकिर्दीत शहरात नगरविकास राज्यमंत्री यांच्या विशेष प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांची कामे मार्गी लागली आहेत. सौ. पोपळघट यांना पक्षश्रेष्ठींनी ठरवून दिलेल्या कालावधीनुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केल्यानंतर नवीन नगराध्यक्षपदासाठी पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनसेवा मंडळाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन उर्वरित 5 महिन्यांसाठी कासार यांच्या नावासाठी मंजुरी दिली.

नगराध्यक्षा सौ. पोपळघट यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला होता. तो राजीनामा मंजूर झाल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी काल प्रांताधिकारी श्रीरामपूर विभाग दयानंद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. कोव्हिडमुळे या सभेस उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, प्रकाश भुजाडी, अशोक आहेर, डॉ. मयूर चुत्तर व मुख्याधिकारी डॉ. श्रीनिवास कुरे यांच्या उपस्थितीत तर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे इतर सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

शहरातील अनेक नागरिक, सहकारी गेल्या काही दिवसांत आपल्याला सोडून गेलेले असताना फटाके, गुलाल, सत्कार असे कुठलाही प्रकारचे सेलिब्रेशन करू नये, असे आवाहन माजी खासदार प्रसाद तनपुरे, डॉ. सौ. उषाताई तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, ना. प्राजक्त तनपुरे यांनी केले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष कासार म्हणाले, माझी नगराध्यक्षपदी झालेली निवड ही कोव्हिडच्या काळात शहराचं आरोग्य सांभाळण्याची मोठी जबाबदारी आहे. तनपुरे कुटुंबाने माझ्यावर मोठ्या विश्वासाने दुसर्‍यांदा नगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली शहरविकासाची घोडदौड अशीच पुढे नेणार हा विश्वास आपल्या सर्वांना देतो.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com