
अकोले |प्रतिनिधी| Akole
श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रातून काम करण्याची सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. अकोले तालुक्याचे नाव जगाच्या नकाशावर चमकावे म्हणून
तालुक्यातील जनतेने पारंपारिक बियाणे जतन करून त्यात वाढ घडवून आणण्यासाठी साथ द्यावी, असे भावनिक आवाहन पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी केले.
अकोले येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आयोजित जागतिक कृषी महोत्सव सप्ताह 2021 निमित्ताने एक दिवसीय जनजागरण सप्ताह सांगता कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी बायफ नाशिक विभागीय अधिकारी जितीन साठे, सौ. कौशल्या तळेकर, सौ. भरीतकर, संजय हुजबंद, मनाली रासने, तालुका प्रतिनिधी विद्याचंद्र सातपुते, तालुका निरीक्षक विजय सावंत तसेच शेतकरी, अकोले, निंब्रळ इतर केंद्रातील महिला व पुरुष सेवेकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पद्मश्री राहिबाई पोपरे म्हणाल्या की, ऊस तोडणीच्या कामावर जाताना श्री स्वामी समर्थ केंद्रात जाणे येणे होते, त्यातून काम करण्यास ऊर्जा मिळाली. काळ्या आईचे म्हणजेच मातीचे आरोग्य अबाधित राखून शेतकरी राजाला सुखी करण्यासाठी हायब्रीड बियाण्यापासून वाचवले पाहिजे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गावरान बियाण्यांचे जतन करून ते वाढविण्यासाठी जिवापाड प्रयत्न केले पाहिजेत.
छोट्याशा झोपडीवजा जागेत सुरू केलेले भारतातील पहिले बीज बँकेचे कार्य जगाला प्रेरणादायी ठरेल. प्रत्येक गावात गावरान बियाण्यांच्या बँका झाल्या पाहिजेत. त्यातून शेतकरी राजा सुखी होण्यास व त्याच्या आत्महत्या थांबवण्यास मदत होऊ शकते. पैशाच्या बँक गल्लोगल्ली भेटतील परंतु पैसा खाता येत नाही.
आपल्या ताटात येणारे अन्न हे सकस आणि विषमुक्त असले पाहिजे त्यातूनच पुढची पिढी सक्षम घडण्यास मदत होणार आहे. मोठ्या प्रमाणावर या बियांचा प्रसार करून शेतकर्यांच्या बांधावर पोहचवण्यासाठी स्वामी समर्थ केंद्र व त्यांचे अनुयायी प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सौ. कौशल्या तळेकर यांनी देशाच्या भावी पिढी असलेल्या मुलांवर संस्कार होण्याच्यादृष्टीने गर्भ संस्कार कसे महत्त्वाचे आहेत, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक संजय हुजबंद यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार मनाली रासने यांनी मानले.
यावेळी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिलांनी बीजमाता सौ. राहीबाई पोपरे यांना हळदी-कुंकू लावून सन्मानीत केले. बाल संस्कार विभागातील स्वरा सुनील शेणकर व कार्तिकी राजेंद्र शेणकर या लहान मुलींनी शेतकरी गीतावर नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.