अकोले |प्रतिनिधी| Akole
बीजमाता पदमश्री राहीबाई पोपरे यांनी प्रथमच कंपनीची पाहणी करून माहिती घेतली व उद्योजकांना कोंभाळणे येथे बीजबँकेला भेट देण्याचे निमंत्रण दिले.
यावेळी बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या कोंभाळणे येथील बीज बँकेला आम्ही उद्योजक भेट देणार असल्याचे प्रतिपादन प्रतिथयश उद्योजक माणिकराव डावरे यांनी सांगितले.
निमित्त होते.. अकोले तालुक्याबरोबरच महाराष्ट्राचे भूषण असलेल्या बिजमाता पदमश्री राहीबाई पोपरे यांनी बायफचे योगेश नवले यांच्या माध्यमातून चाकण येथील प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग कंपनीला दिलेल्या भेटीचे.
श्री. डावरे म्हणाले, राही मावशींचे अतिशय स्तुत्य असे काम आहे. तब्बल 175 गावरान बियाणांचे रजिस्ट्रेशन त्यांच्याकडे आहे. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी ही बियाणं जतन केलेली आहेत .म्हणूनच त्यांच्या कामाची दखल बीबीसीने घेतली व त्या 2018 च्या बीबीसीच्या 100 महिलांपैकी पहिल्या तीन भारतीय महिलांमध्ये आहेत. ही आपल्या भारताच्यादृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे. त्यांना आत्ता पर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
अतिशय साधी राहणी व उच्च विचारसरणी हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. आणि त्यांचा स्वभाव बोलण्यामध्ये एकदम परखड आहे. विषमुक्त शेती व शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर व्हावा म्हणून त्यांची चाललेली धडपड ही त्यांच्यातील तळमळ लपून राहत नाही. यावेळी कंपनीच्यावतीने बीजमाता राहीबाईंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राहीबाई म्हणाल्या की, त्यांच्या या कामामध्ये त्यांना बायफ संस्थेचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी राहीबाई पोपरे यांनी कंपनीमध्ये फिरून काय काम चालते व कसे काम चालते याची माहिती घेतली. त्यावेळी राहीबाई पोपरे म्हणाल्या की, मी आत्तापर्यंत या पहिल्याच कंपनीमध्ये अशी पाहणी करत आहे.
अकोले तालुक्यातील युवक स्वतःच्या परिश्रमाने स्वतःच्या कंपनीचा मालक होतो, व गावाकडील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम करतो ही बाब अकोले तालुक्याच्या दृष्टीने अतिशय समाधानाची बाब असून त्यांनी माणिकराव डावरे यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी राहिबाई पोपरे यांची सीड बँक पाहायला त्यांच्या गावी कोंभाळणे येथे बोलावले आहे, आणि आम्ही नक्की जाणार आहोत, असे माणिकराव डावरे व त्यांच्या सहकार्यांनी सांगितले.