राहिबाई पोपेरे यांचा राजस्थानात सन्मान

राहिबाई पोपेरे यांचा राजस्थानात सन्मान

अकोले |प्रतिनिधी| Akole

प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माउंट आबू राजस्थान येथेल जागतिक मुख्यालय असलेल्या मंचावरून बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे 140 देशात लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यांचा आंतरराष्ट्रीय मंचावरून सचिव बी. के. मृत्युंजय, बी. के. दीपक हरके, बी. के. कविता, बी. के. नलिनी, बी. के. हे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

जगभर देशी व गावरान बियाणे संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेल्या राहिबाई यांचे पारंपरिक ज्ञान आणि अभ्यास प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातील आपल्या अनुयायांना माहिती व्हावे यासाठी या सन्मानाचे आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मानवाला चांगले विचार आणि सुदृढ व निरोगी आरोग्य लाभण्यासाठी सात्विक आहार रोजच्या जेवणात आला पाहिजे. विषमुक्त अन्न प्रत्येक देशवासीयांसाठी निर्माण करण्यासाठी दर्जेदार आणि गावरान बियाणे संवर्धन होणे काळाची गरज आहे. त्याशिवाय दर्जेदार आणि सकस आहार आपण तयार करू शकत नाही.

देशी बियाणे वापरून लागवड केलेली पिके रासायनिक खते आणि औषधे यांचा वापर न करता वाढवता येणे तुलनेने सोपे आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या शेतावर आणि बांधावर गावरान बियाणे पोहचवणे हे आपल्या जीवनाचे लक्ष्य असल्याचे त्यांनी व्यासपीठावरून जाहीर केले. बदलत्या हवामानात आणि जागतिक तापमान वाढीचा फटका शेती क्षेत्राला सर्वात मोठ्या प्रमाणमध्ये बसत आहे. यावर पर्याय देशी बियाणे ठरत आहेत. हे आता जगाने मान्य केले आहे. एकाच पिकाच्या मागे न लागता जास्तीत जास्त पिके लागवड करून आपण बारीक होत चाललेली जेवणाची थाळी पुन्हा मोठी आणि सकस व सात्विक करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आपल्या अनुयायांना देशी बियांच्या माध्यमातून शास्वत व रसायनमुक्त शेतीचा अभ्यास बायफ संस्था- पुणे आणि पद्मश्री राहीबाई यांचे माध्यमातून करून देणार आहेत ही माहिती प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक बी. के. डॉ. दीपक हरके यांनी दिली. या सन्मानाने बीजमाता राहीबाई पोपेरे व बायफ संस्थेचे कार्य व विचार जगभर पोहचवण्यात मोठी मदत होणार आहे.

Related Stories

No stories found.