कही खुशी, कही गम! अनेक इच्छुकांचा हिरमोड

राहाता तालुक्यात जि. प. गट, पंचायत समिती गणांचे आरक्षण
कही खुशी, कही गम! अनेक इच्छुकांचा हिरमोड

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 गटांतील व पंचायत समितीच्या 12 गणांचे आरक्षण जाहीर झाले. मात्र अनेकठिकाणी अपेक्षित आरक्षण नसल्याने काही गटात व काही गणात अनेकांची पंचाईत झाली आहे तर काही गटात व गणात अपेक्षित आरक्षण व सर्वसाधारण जागा असल्याने काही जण खुश आहेत.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य तथा माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांचा लोणी खुर्द ओबीसी महिलेसाठी राखीव होता आता हा गट सर्वसाधरण महिला झाल्याने सौ. विखे यांना हा गट सुरक्षित आहे. जिल्हा परिषदेचा वाकडी गट गेल्यावेळी ओबीसी महिलेसाठी राखीव होता. या गटात कविता लहारे या निवडून आल्या होत्या. आता हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांच्यासाठी हा गट सुरक्षित आहे. इतर ठिकाणी विद्यमान जि. प. सदस्यांचे पुणतांबा, साकुरी, कोल्हार बु. हे राखीव असल्याने त्यांना अडचणीचे ठरले आहेत.

राहाता तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 गटांचे व 12 गणांचे आरक्षण काल जाहीर झाले. तालुक्यातील पुणतांबा गट मागील वेळी अनुसूचित जातीसाठी राखीव होता. या गटातून त्यावेळी शाम माळी निवडून आले होते. आता हा गट सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव झाल्याने माळी यांना पुन्हा संधी मिळणार नाही. या गटात अनेक इच्छुंक उमेदवारीसाठी आता आपल्या घरातील महिलेसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहेत. या गटात सावळीविहीर बु. व पुणतांबा या दोन गणांचा समावेश होतो. सावळीविहीर गणात मागीलवेळी विद्यमान उपसभापती ओमेश जपे खुल्या वर्गातून उभे होते. त्यांचा हा गण आता ओबीसी महिला राखीव झाला असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. पुणतांबा गण मागील वेळी अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव होता. या गणातून सुवर्णा तेलोरे यांनी नेतृत्व केले. आता हा गण अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे तेलोेरे यांची पंचाईत झाली आहे.

वाकडी गट गेल्या वेळी ओबीसी महिलेसाठी राखीव होता. या जागेवर गेल्यावेळी कविता लहारे या सदस्य होत्या. आता हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. त्यांना हा गट सुरक्षित मानला जातो. हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने अनेकांनी या जागेवर वर्णी लावण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या गटात वाकडी व अस्तगाव हे दोन गण आहेत. वाकडी गण सर्वसाधारण आहे. मागीलवेळी या गणात ओबीसीतील अर्चना आहेर या सदस्य होत्या. आता हा गण सर्वसाधारण झाला आहे. या गणात इच्छुकांची मोठी गर्दी होऊ शकते. या गटात फेररचेनेत नव्याने समाविष्ट झालेला अस्तगाव गण ओबीसीसाठी राखीव आहे. अस्तगाव गणाचे नेतृत्व मागीलवेळी साकुरी गटात असताना शोभा जेजुरकर यांनी केले होते. त्यांना हा गट सुरक्षित असला तरी ओबीसी पुरुषांनाही या गणातून संधी मिळू शकते.

साकुरी गट मागील वेळी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होता. पुष्पाताई दीपक रोहोम यांनी या गटाचे सलग दोनदा नेतृत्व केले. यावेळी हा गट ओबीसीसाठी राखीव झाला आहे. या गटात निमगाव कोर्‍हाळे व साकुरी गणांचा समावेश आहे. नवीन निर्माण झालेल्या निमगाव कोर्‍हाळे गण अनुसूचित महिलेसाठी राखीव आहे. मागीलवेळी साकुरी गणातून माजी पंचायत समिती सभापती हिराबाई कातोरे या सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उभ्या होत्या. त्या नेमक्या निमगाव कोर्‍हाळे गणात येतात. तो गण राखीव आहे. त्यांचीही अडचण झाली आहे. आता तर साकुरी गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.

बाभळेश्वर गट नव्याने अस्तित्वात आला आहे. बाभळेश्वर गटात सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. या गटात निर्मळ पिंपरी आणि बाभळेश्वर या गणांचा समावेश होतो. निर्मळ पिंपरी गण ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. हा गण नव्याने अस्तित्वात आला आहे तर बाभळेश्वर गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. गत वेळी लोहगाव गणातून माजी उपसभापती बाबासाहेब उर्फ बबलू म्हस्के सदस्य होते. त्यांची आता पंचाईत झाली आहे.

लोणी खुर्द जिल्हा परिषद गटात गेल्या वेळी ओबीसी महिलेसाठी हा गट राखीव होता. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी या गटाचे नेतृत्व गेल्या वेळी केले. यावेळी हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. असे असले तरी सौ. विखे यांच्यासाठी हा गट सुरक्षित आहे. या गटात लोणी खुर्द व लोणी बु. हे दोन गण येतात. लोणी खुर्द गणाचे नेतृत्व मागीलवेळी अनुसूचित जमाती मधील काळू रजपूत यांनी केले. आता हा गण सर्वसाधारण झाला आहे. लोणी बु. चे नेतृत्व अनुसूचित जातीमधील उमेद्वार संतोष ब्राम्हणे यांनी केले होते. आता हे दोन्हीही गण खुले आहेत.

कोल्हार बु. गट हा अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. दिनेश बर्डे यांनी या गटाचे नेतृत्व केले. आता यावेळी हा गट ओबीसीसाठी राखीव झाला आहे. या गटात कोल्हार बु. व दाढ बु. या दोन गणांचा समावेश होता. कोल्हार बु. मागील वेळी ओबीसींसाठी राखीव होता. भारत आंत्रे यांनी या गणाचे नेतृत्व केले. आता हा गण खुला आहे. दाढ बु. या गणात विद्यमान सभापती नंदाताई तांबे यांनी नेतृत्व केले. आता हा गण अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे सौ. तांबे यांची पंचाईत झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com