अखेर राहात्यात श्रावणसरीत सुसाट वार्‍यासह पावसाची सर्वदूर हजेरी

अखेर राहात्यात श्रावणसरीत सुसाट वार्‍यासह पावसाची सर्वदूर हजेरी

राहाता |प्रतिनीधी| Rahata

पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांची घडी विस्कटली होती. आकाशाकडे टक लावून बघणार्‍या बळीराजाची चिंता वाढली होती. खरिपाची पिके सुकू लागली होती. गेल्या चार सहा दिवसांपासून नभ दाटून यायचे, पाऊस कोसळेल अशी अपेक्षा शेतकर्‍यांना असताना पाऊस सातत्याने हुलकावणी देत होता. मात्र सोमवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पावसाच्या मध्यम सरींनी एक तास हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

मान्सूच्या सुरूवातीला काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली. नंतर पावसाचा लपंडाव सुरू झाला. जून महिन्याच्या अखेरीस पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी खरीप पिकांची पेर केली. कशी बशी पिके बहरू लागली आणि पुन्हा पावसाने दडी मारली. मोठ्या् अडचणीतून बी-बियाणे , औषधे खरेदी करून शेतकर्‍यांनी धाडस केले. कष्ट आणि खर्च वाया जाईल, अशी परिस्थीती निर्माण झाली. ज्यांच्याकडे पाण्याची मुबलकता होती त्यांनी तुषार सिंचनाद्वारे पिके जगवण्यासाठी धडपड केली.परंतु पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली पिके धोक्यात आली.

गेल्या चार-सहा दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत होता. सोमवारी सायंकाळी काळे नभ दाटून आले. पावसाची चाहूल लागताच रस्त्यावर दुकाने थाटलेल्या शहरातील व्यापार्‍यांनी दुकानाची आवराआवर केली. बघता बघता पावसाने सुरूवातीला अर्धातास दमदार बॅटींग केली तर मध्यम स्वरूपाचा पाऊस अर्धा तास पडत होता. कालच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली. या पावसाने दिलासा मिळाला असला तरी पिकांना जीवदान मिळण्यासाठी संततधार पावसाची गरज आहे. पिकांना जीवदान मिळाले तरी उत्पादन क्षमतेत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com