तब्बल दोन वर्षांनंतर राहाता आठवडे बाजार पूर्ववत सुरू

तब्बल दोन वर्षांनंतर राहाता आठवडे बाजार पूर्ववत सुरू

राहाता |वार्ताहर| Rahata

उद्भवलेल्या करोना परिस्थितीमुळे बंद पडलेला राहाता आठवडे बाजार तब्बल दोन वर्षांनंतर पूर्ववत सुरू झाल्याने फळे, भाजी विक्रेते व व्यापार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते तर बाजार सुरू होण्याचा पहिला आठवडा असल्याने अनेकांना याची कल्पना नसल्यामुळे व्यापारी व वस्तू खरेदी करण्यासाठी येणार्‍या ग्राहकांची संख्या कमी दिसली.

कोविड संकट दूर होऊन बाजार पूर्वीप्रमाणे सुरू व्हावेत, अशी अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशात करोना या आजारामुळे लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी करोना संसर्ग वाढू नये म्हणून देशातील सर्वच ठिकाणी गर्दी होणार्‍या व्यावसायिकांवर सरकारने निर्बंध आणून व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात मुख्य गर्दी होणारा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतल्याने हातावर पोट असणार्‍या लाखो व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.

आठवडे बाजार बंद असल्यामुळे शेतकर्‍यांना शेतीमालाची विक्री करण्यासाठी योग्य जागा नसल्याने शेतीमालाला भाव मिळाला नाही. करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आठवडे बाजार बंद असल्यामुळे अनेकांची आर्थिक गणिते बिघडली होती. व्यवसायासाठी अनेकांनी कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते कसे भरावेत, असा अनेकांना प्रश्न निर्माण झाला होता.

राहाता नजीक असलेल्या शिर्डी हे आंतरराष्ट्र दर्जाचे तीर्थक्षेत्र समजले जाते. शिर्डीमुळे राहाता परिसरातील 60 गावांचे अर्थचक्र अवलंबून आहे. परंतु कोविडमुळे साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने अनेकांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. तसेच शिर्डी परिसरातील हॉटेल व्यवसाय बंद असल्याने भाजी विक्रेते व शेतकर्‍यांची मोठी आर्थिक हानी झाली. करोना संसर्ग कमी झाल्याने राज्य सरकारने आठवडे बाजार सुरू करण्यासाठी परवानगी दिली असल्याने 11 नोव्हेंबर रोजी राहाता येथे तब्बल दोन वर्षानंतर आठवडे बाजार सुरू झाला त्यामुळे शेतकरी, भाजी, फळे विक्रेते व इतर छोटे-मोठे व्यावसायिकांच्या चेहर्‍यावर आनंद दिसू लागला आहे. करोनाचे सावट कायमचे दूर व्हावे व आठवडे बाजार नेहमीच सुरू राहावा यासाठी व्यावसायिक देवाला साकडे घालत आहेत.

लॉकडाऊननंतर प्रथमच गुरुवारी राहाता येथील आठवडे बाजार सुरू झाल्यामुळे आनंद वाटतो. दोन वर्षांपासून आठवडे बाजार बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अनेक फळ व भाजी विक्रेत्यांना कुटुंबियांचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न भेडसावत होता. आठवडे बाजार सुरू झाल्याने आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

- कैलास उदमले, भाजी विक्रेते, राहाता

दोन वर्षांनंतर राहाता येथील आठवडे बाजार सुरू झाल्यामुळे मोठे समाधान वाटते. करोनामुळे आठवडे बाजार बंद होता. त्यामुळे व्यवसायिकांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. आठवडे बाजार पूर्वीप्रमाणे सुरू होणार असले तरी आर्थिक परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी 3 ते 4 वर्ष कालावधी लागणार आहे.

- हरी बोबडे, भाजीपाला व्यापारी, राहाता

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com