राहाता : जनता कर्फ्यू विरोधात चहावाटप करत उपनगराध्यक्षांची ‘गांधीगिरी’

राहाता : जनता कर्फ्यू विरोधात चहावाटप करत उपनगराध्यक्षांची ‘गांधीगिरी’

राहाता (प्रतिनिधी) - जनता कर्फ्यू हा स्वयंस्फुर्तीने न होता राजकीय इव्हेंट झाला आहे. नगरपालिका प्रशासनावर सत्ताधारी भाजपचा दबाव असल्याने बोटावर मोजण्या इतपत व्यापारी वर्गाला सामोरे करून प्रशासन छोट्या व्यवसायिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप करत उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी जनता कर्फ्यू असताना नगरपरिषद कार्यालयासमोर चहा विकून गांधीगिरी केली.

राहाता शहरात गुरूवारी जनता कर्फ्यू तर इतर दिवस दुकाने स. 7 ते 4 वाजेपर्यंत सुरू करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. बुधवारी व्यवसायिकांची बैठक घेत व्यवसायिकांनी उत्सफुर्तपणे 4 वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास पाठिंबा दिल्याचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी जाहीर केले.

मात्र या बैठकीत ठराविक व्यापार्‍यांना बोलावल्याचा आरोप उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी केला आहे. नगरपरिषदेच्या निर्णयाचा निषेध करत जनता कर्फ्यू असताना पठारे यांनी नगरपरिषदेसमोरच चहाचे दुकान थाटून चहा वाटप केले. जनतेवर सक्ती नको ज्या व्यावसायिकांना दुकाने सुरू ठेवायची आहेत त्यांनी ती खुली ठेवावीत आणि ज्या व्यापार्‍यांना बंद ठेवायची आहे त्यांनी बंद पाळावा, असे आवाहन पठारे यांनी गांधिगीरी आंदोलन करत केले आहे.

राहाता शहराचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनाच नगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात करोनाचा प्रभाव कमी होत असल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सगळे उद्योग व्यवसाय कोणत्याही निर्बंधाशिवाय चालू करण्यास शासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर जिल्ह्यातील सगळे उद्योग व्यवसाय सुरू झाले. मात्र राहाता शहरात प्रशासनाने गुरूवारी जनता कर्फ्यू आणि इतर दिवशी दुपारी चार वाजे पर्यंतच उद्योग व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे हातावर पोट असणारे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. संध्याकाळी ज्यांचा व्यवसाय सुरू होतो अशा लोकांनी करायचं काय? असा सवाल उपस्थित करत उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी काल स्वतः नगरपालिके समोर चहाचे दुकान चालू केले आणि अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

एकिकडे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस लॉकडाऊनला विरोध करतात तर दुसरीकडे राहाता नगरपालिकेत भाजपची सत्ता असून देखील लॉकडाऊन, जनता कर्फ्यू लावण्यास नागरिकांना भाग पाडले जात आहे. सक्ती न करता व्यापारी हित लक्षात घेऊन सर्व समावेशक निर्णय घ्यावा. काही कथित व्यापारी वर्गावर राजकीय दबाव टाकून सक्ती होता कामा नये अशी मागणी पठारे यांनी केली आहे.

या गांधीगिरी आंदोलनात पठारे यांचेसह नगरसेवक सागर लुटे, युवा सेनेचे शहराध्यक्ष भागवत लांडगे यांनी सहभाग घेतला. काही व्यवसायिकांनीही या आंदोलनास पाठींबा दर्शवला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com