राहात्यात युरियासाठी शेतकर्‍यांच्या रांगा
सार्वमत

राहात्यात युरियासाठी शेतकर्‍यांच्या रांगा

मागणी 750 टनाची पुरवठा मात्र अवघा 70 टन

Arvind Arkhade

राहाता|तालुका प्रतिनिधी|Rahata

राहाता तालुक्यात युरिया खताची तिव्र टंचाई निर्माण झाली आहे. युरियाची मागणी 750 टनाची आहे. मात्र पुरवठा अवघा 70 टनाचा झाला. त्यामुळे युरिया खरेदीसाठी कृषी दुकानांसमोर शेतकर्‍यांच्या रांगा लागत असून गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बोलावे लागत आहे. तसेच तणनाशकांची जादा दराने विक्री होत असल्याने कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून राहाता तालुक्यात युरिया खताचा तुटवडा असून शेतकरी युरियाच्या शोधात वणवण भटकत आहे. मका, बाजरी व उसासाठी युरिया आवश्यक असताना दोन महिन्यापासून बाजारातून युरिया बेपत्ता झाल्याने पिकांना काय खते घालायची याची चिंता शेतकर्‍यांना भेडसावत आहे.

राहाता बाजार समिती समोरील कोपरगाव शेतकरी संघाच्या दुकानात 15 टन युरीयाची विक्री सुरू झाल्याची माहीती मिळताच तेथे जत्रेचे स्वरूप काल पहायला मिळाले. त्यासाठी रांगा लागल्या. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी चक्क पोलिसांना बोलवावे लागले. ज्यांचा वशिला त्यांनी अगोदरच खरेदी केली तर सर्वसामान्य शेतकरी रांगेत असतानाच युरिया संपली.

अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. असेच चित्र सर्वत्र पहावयास मिळत असून अगोदरच पावसाने फटका दिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यात रासायनिक खते मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी युरीयाची टंचाई असल्याचे सांगितले.

या महिन्यासाठी राहाता तालुक्यासाठी 750 टन युरियाची मागणी केली होती. मात्र अवघी 70 टन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ठिकठिकाणी होत असलेल्या लॉकडाऊनमुळे रॅक लागत नसल्याने युरिया मिळण्यास अडचणी येत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

सरकारने रासायनिक खतांच्या प्रश्नी लक्ष घालून खते उपलब्ध करून द्यावी तसेच सोयाबीन पिकासाठी लागणारे तणनाशकांचाही मोठ्या प्रमाणावर तुटवडा असून जादा भावाने विक्री केली जात आहे. जादा भावाने विक्री करणार्‍या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com