राहाता (तालुका प्रतिनिधी) -

राहाता तालुक्यात होत असलेल्या 25 ग्रामपंचायत निवडणुकीपैकी 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून आ. राधाकृष्ण विखे गटाचे निर्वीवाद

वर्चस्व पुन्हा सिध्द झाले आहे. कोल्हार बु, तिसगांव, पिंप्री लोकई, भगवतीपूर, सावळीविहीर खुर्द, व लोणी बु. या सहा ग्रामपंचायतीत 76 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 19 ग्रामपंचायतीच्या 217 जागांसाठी 493 उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी तहसील कार्यालयासमोर मोठा जल्लोष साजरा केला.

राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून काल उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोल्हार बु. (17) जागा, तिसगाव (9) जागा, पिंप्री लोकई (7) जागा, भगवतीपूर (15) जागा, सावळविहीर, खुर्द (11) जागा, लोणी बु. (17) या सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सर्व ग्रामपंचायतीत आ. विखे पाटील यांच्याच दोन गटात लढत होती. आ. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली समोपचाराने या सर्व निवडणुका बिनविरोध पार पडल्याने तालुक्यात विखे यांचेच निर्वीवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे.

निवडणूक होत असलेल्या 19 ग्रामपंचायतीमधे अस्तगाव ग्रामपंचायतीत 3 जागा बिनविरोध झाल्या. केलवड बु., खुर्दमध्ये 1 जागा बिनविरोध झाली. नांदूर ग्रामपंचायतीत 1 जागा बिनविरोध, हणमंतगाव ग्रामपंचायतीत 2 जागा बिनविरोध, हसनापूर ग्रामपंचायतीत 1 जागा बिनविरोध पार पडली.

ममदापूर, लोणी खुर्द, वाळकी, हणमंतगाव, जळगाव-एलमवाडी, रांजणगाव खुर्द, रामपुरवाडी, शिंगवे, आडगाव बु., हसनापूर, चंद्रापूर, अस्तगाव, एकरुखे, केलवड बु., खुर्द, गोगलगाव, नांदूर, पाथरे बु., पिंपळवाडी, बाभळेश्वर ग्रामपंचायतींच्या 217 जागांसाठी 493 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

तालुक्यात होत असलेल्या 25 ग्रामपंचायतीच्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्यावतीने सर्व ताकतीनिशी लढवू अशा घोषणा दिल्या. यावेळी निवडणूक रंगतदार होईल असे चित्र भासत असताना सहा ग्रामपंचायती विखे गटाने ताब्यात घेऊन तालुक्यात विखेंचेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.