शिक्षक पुरस्कारातून राहाता तालुका वगळला

१३ शिक्षकांना पुरस्कार जाहीर
शिक्षक पुरस्कारातून राहाता तालुका वगळला

अहमदनगर (प्रतिनिधी) -

प्राथमिक शिक्षक आतूरतेने वाट पाहत असलेल्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांच्या यादीला शनिवारी सायंकाळी विभागीय आयुक्तांकडून मान्यता मिळाली. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

दरम्यान, हुंडाबळी (भादवी कलम ४९८) प्रकरणी दाखल गुन्हा निकाली निघालेला असतांनाही विभागीय आयुक्तांनी राहाता तालुक्यातील शिक्षकाचा प्रस्ताव ऐनवेळी नाकारला आहे. यामुळे राहाता तालुका वगळता जिल्ह्यातील १३ तालुक्यातून प्रत्येकी एक असे १३ शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून दरवर्षी शिक्षक दिनी प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १४ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात येते. पूर्वी हा पुरस्कार प्राप्त शिक्षकाला राज्य सरकारकडून एक वेतन वाढ देण्यात येत होती. मात्र, काही वर्षापासून ही पध्दत बंद करण्यात आली आहे. असे असतांना सन्मानासाठी अनेक शिक्षक हा पुरस्कार प्रतिष्ठेचा करतात. यातून प्रत्येक तालुक्यातून पुरस्कारासाठी स्पर्धा असते.

यंदा देखील प्रत्येक तालुक्यातून ३ या प्रमाणे उत्कृष्ठ काम असणाऱ्या शिक्षकांची प्रस्ताव मागविण्यात आले होते. मात्र, तांत्रिक कारणामुळे दोन तालुक्यातून प्रत्येकी दोनच प्रस्ताव आले होते. जिल्हाभरातून यंदा जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी एकूण ४० प्रस्ताव आले होते. या पुरस्कारासाठी पोलीसांकडून चारित्र पडताळणी करण्यात येते. यात राहाता तालुक्यातील दोन शिक्षकांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल असल्याचे म आले. यातील एका शिक्षकांचा हा गुन्हा निकाली निघालेला असतांनाही विभागीय आयुक्तांनी ऐनवेळी तो मान्य केला नाही. यामुळे राहाता तालुक्यातील पुरस्कार स्थगित ठेवण्यात आला आहे. उर्वरित तालुक्यातील १३ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये हरिबा लक्ष्मण चौधरी (जि.प. शाळा सावरकुटे, अकोला). वृषाली सुनील कडलग (जि.प. देशमुख मळा, संगमनेर), किरण वाल्मिक निंबाळकर, (जि. प. शाळा कारवाडी, कोपरगाव), कल्पना कौतिक बावीस्कर (जि.प. मालविय वाडी, श्रीरामपूर), विठ्ठल रघुनाथ काकडे (जि.प. गाढेवाडी, राहुरी), रविंद्र बाबासाहेब पागिरे, (जि. प. शाळा, सौंदाळा, नेवासा), भरत गोवर्धन कांडकर (नांदूर विहीरे, शेवगाव), तुकाराम तुळशीराम अडसूळ (जि.प. शाळा गितेवाडी, पाथर्डी), पांडूरंग लक्ष्मण मोहळकर (जि.प. शाळा पाडळी, जामखेड), उज्वला धनाजी गायकवाड (जि.प. शाळा तिखी, कर्जत), राजेंद्र विठ्ठल पोटे (जि.प. शाळा, अरणगाव, श्रीगोंदा), रामदास राघु नरसाळे (जि.प. शाळा पोखरकर झाप, पारनेर), ज्योती मारूती भोर, (जि.प. शाळा दत्तनगर, नगर) यांचा समावेश आहे. यासह जिल्हा पातळीवर देण्यात येणारा उत्कृष्ट केंद्रप्रमुख पुरस्कार शेवगाव तालुक्यातील शेख युसूफ नमदभाई यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार विजेत्या शिक्षकांचे जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती सुनील गडाख, काशिनाथ दाते, उमेश परहर आणि मीराताई शेटे यांनी अभिनंदन केले आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com