
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
राहाता तालुक्यातील 60 गावांपैकी 55 गावांमध्ये करोनाचे सक्रीय रुग्ण संख्या शुन्यावर आली असल्याने तालुकावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. उर्वरीत पाच गावांमध्येही केवळ पाच सक्रीय रुग्ण संख्या आहे.
करोनाची लाट ओसरत असल्याने राहाता तालुका करोनामुक्तिकडे वाटचाल करीत आहे. आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, पंचायत समिती व गावामधील स्थानिक प्रशासन यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे राहाता तालुक्यातील 55 गावांमध्ये दि.28 मार्चच्या अहवालानुसार एकही रुग्ण नाही तर उर्वरीत पाच गावांमध्ये केवळ पाचच सक्रीय रुग्ण आहेत. तालुक्यातील बहुतांश गावांत करोनाचा प्रादूर्भाव ओसरत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेल्या राहाता, शिर्डी, लोणी खुर्द या गावांमध्येही रुग्णसंख्या शून्य असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील एकूण सक्रीय रुग्ण संख्या केवळ पाच आहे. यामध्ये नांदुर्खी 02, वाकडी, राजुरी, लोहगाव, लोणी बुद्रुकमध्ये प्रत्येकी 01 सक्रीय रुग्ण आहेत. दैनंदिन सापडणार्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट आल्याने सक्रीय रुग्ण संख्या असणार्या गावांची संख्याही दर आठवड्यात कमी होत आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळाही सुरू झाल्या आहेत.दहावीच्या परीक्षाही सुरळीत सुरू आहेत.
बारा गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण
तालुक्यात करोना प्रतिबंधात्मक लसिकरणही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एलमवाडी, तरकसवाडी, चोळकेवाडी, धनगरवाडी, नांदूर खुर्द, एकरूखे, हसनापूर, डोर्हाळे, नांदुर्खी खुर्द, सावळीविहीर खुर्द, सावळीविहीर बुद्रुक, नांदुर्खी खुर्द, नपावाडी, चितळी, दुर्गापूर, रांजणगाव, पिंपरी निर्मळ, नांदूर खुर्द या 19 गांवामध्ये शंभर टक्के लसीकरण झाले आहे.