राहाता तालुक्यात लसीचा तुटवडा

राहाता तालुक्यात लसीचा तुटवडा

राहाता |प्रतिनिधी|Rahata

सर्वच लसीकरण केंद्रावर लस शिल्लकच नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना लसीकरणासाठी ताटकळावे लागत आहे. केंद्र पातळीवर लस नेमकी कधी उपलब्ध होईल याची कुणालाही माहिती नाही.

लसीची उपलब्धता होत नसल्याने राहाता तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रावर शुक्रवारपर्यंत लस उपलब्ध होईल की नाही? याबाबत शंका असल्याने तसेच लसीच्या उपलब्धते संदर्भात कुठल्याही प्रकारचे लेखी माहिती नसल्याने आरोग्य विभागातील लसीकरण केंद्रातील कर्मचारी व डॉक्टरांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. किमान चार-पाच दिवसात लस उपलब्ध होईल, अशी चिन्हे दिसत नसल्याने शनिवारपर्यंत राहाता तालुक्यातील केंद्रावर लसीकरण बंद राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

काल सोमवारी लसीकरणाचा दिवस असल्याने सर्वच केंद्रावर लस संपल्याचे बोर्ड लावल्याचे दिसून येत होते. करोनाबाबत शरीरात भक्कम प्रतिकारशक्ती असणे गरजेचे आहे. करोनापासून होणारा गंभीरतेचा संभाव्य धोका टाळण्याकरिता शरीरातील प्रतिकारशक्ती प्रभावी व सक्षम असण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. याबाबत आता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने नागरिक लस घेण्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रांवर गर्दी करू लागले आहेत. यापूर्वी लस उपलब्ध असायची तर ती घेण्यासाठी फारसे नागरिक इच्छुक नसायचे त्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचार्‍यांवर लसीकरण करून घेण्यासाठी माणसे शोधण्याची वेळ येत.

व्हायल मधील लस वाया जावू नये म्हणून अनेकांना फोन करून लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे लागत असे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. लसीच्या संख्येच्या तुलनेत लस घेणारांची संख्या दुप्पट तिप्पट असते. लसीचा तुटवडा असल्याने लोकांना लस मिळणे कठीण झाले आहे. करोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा एक महत्वपूर्ण पर्याय ठरू शकतो. म्हणून शासनाने लसीकरणावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. एकीकडे लसीचा तुटवडा तर दुसरीकडे लसीकरणासाठी केंद्रावर येणारांची वाढती गर्दी, त्यातच लस येईल याची शाश्वती नाही. शुक्रवारपर्यंत लस येईल का नाही. याबाबत साशंकता आहे. अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. कोव्हिशिल्डचा पाहिला डोस घेतल्यानंतर 45 दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा,असे वैद्यकिय तज्ञांचे मत आहे.

काहींचे 45 दिवसही उलटून गेले आहे. दुसरा डोस लांबत चालला आहे. एका प्राथमिक आरोग्य केंद्रास 100 डोस मिळतात. मात्र 300 ते 400 नागरिक लसीकरणासाठी येतात. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तीचे सुद्धा रजिस्ट्रेशन होत असून आपला लसीकरणासाठी केंव्हा नंबर येईल व लस घेऊन आपण केव्हा सुरक्षित होऊ या प्रतिक्षेत अनेकजण आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com