राहाता तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

राहाता तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

अस्तगाव परीसरात झाडे उन्मळून पडली, विज गायब, चारा पिके भुईसपाट

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

काल सायंकाळी 6.30 नंतर अस्तगाव भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार वादळी पाऊस झाला. या वादळाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळुन पडली. शेतातील मका सारखे चार्‍याचे पिकही भुईसपाट झाले.

या वादळी पावसाने अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. काहींच्या फांद्या पडल्या, काही झाडे विज वाहुन नेणार्‍या वाहिन्यांवर पडले. गोर्डे वस्ती भागात हा प्रकार घडला. गोदावरी कालव्यापासून काही अंतरावर एकरुखे रोड लगत मल्हारी जेजुरकर यांच्या लिंबाचे वृक्ष उन्मळून पडले. त्यांच्या बोरीचे झाडही पडले.

राजुरी रस्त्यालगत असणार्‍या नितीन लोंढे व अन्य लोंढे वस्तीवरील अनेकांचे शेतात उभे असणार्‍या चारा मका पीक भुईसपाट झाले. एक ते दोन एकरापर्यंत प्रत्येक शेतकर्‍याचे चारा पिके होती ते भुईसपाट झाले. वार्‍याला प्रचंड वेग असल्याने अन्यत्रही नुकसान झाले. काही ठिकाणी झाडे मुळासकट भुईसपाट झाले. शरद गोर्डे यांच्या घरासमोर लावलेल्या दुचाकीवर झाड पडले, त्यात दुचाकीचे नुकसान झाले.

शिर्डी परिसरात पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणतांब्यातही वादळी वार्‍यासह पावसाने तासभर हजेरी लावली. पिंपळवाडी तसेच वाकडी परिसरातही पावसाने वादळी वार्‍यासह हजेरी लावली. बुधवारी संध्याकाळी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साठले. दोन दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावत पिकांना साधक बाधक परिस्थिती निर्माण केली आहे. सोयाबिन पिकांमध्ये अजुनही पाणी साठून आहे. त्यात आजच्या पावसाने भर पडली आहे. त्यामुळे सोयाबीनचे भवितव्य धोक्यात येवु शकते. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा अर्थिक फटका बसू शकतो.

गोदावरीचा विसर्ग घटला!

दरम्यान नाशिक परिसरात पावसाचा जोर ओसरल्याने धरणांचे विसर्ग कमी करण्यात आले आहेत. काल संध्याकाळी 8 वाजता नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत 11363 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

15 चारी परिसरात 4 घरांचे पत्रे उडाले; तीन तास वाहतूक ठप्प

राहाता |वार्ताहर| Rahata

राहाता शहरात शनिवारी रात्री अचानक झालेल्या वादळी वारा व पावसामुळे 15 चारी परिसरात विद्युत खांब, तारा झाडे जमीनदोस्त तर चार घरांचे पत्रे उडून गेले. वादळामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.

शनिवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळी पावसामुळे विजेचे खांब व झाडे रस्त्यावर पडल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची 3 तास कोंडी झाली. अमोल सदाफळ यांनी त्यांच्या जेसीबी मशीन द्वारे रस्त्यावर पडलेले झाडे व विद्युत खांब हटवण्याची मोहीम हाती घेतल्यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत झाली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या घटनेबाबत माहिती कळताच त्यांनी त्यांच्या कार्यालयातील अनुप कदम यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितले. ना. विखे पाटील यांच्या सूचनेवरून बांधकाम व महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

15 चारी येथील संजय सदाफळ, भाजपचे राहुल सदाफळ, वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष सागर सदाफळ, काँग्रेस शहराध्यक्ष नितीन सदाफळ, राष्ट्रवादीचे हेमंत सदाफळ, दत्तात्रेय सदाफळ, प्रभाकर लुटे, सचिन गिरमे, सागर बोराडे, अजय सदाफळ, गणेश सदाफळ, सागर रोकडे अक्षय गायकवाड, निलेश त्रिभुवन, सलीम शेख, विलास सोनवणे, पप्पू पाळंदे बांधकाम व महावितरण विभागाचे कर्मचारी यांच्यासह या परिसरातील नागरिकांनी वाहतूक कोंडी दूर करण्याकरिता तात्काळ पडलेले झाडे व विजेचे खांब बाजूला करण्याकरिता मोहीम हाती घेतली. शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे या परिसरातील अनेक शेतकर्‍यांचा शेतातील ऊस व मका जमिनीवर पडले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com