जलसंपदाने रडवले, पावसाने हसवले!

जलसंपदाने रडवले, पावसाने हसवले!

राहाता तालुक्यात मोठ्या खंडानंतर पावसाची जोरदार हजेरी

अस्तगाव |वार्ताहर| Ahmednagar

काल सायंकाळी राहाता तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे. जलसंपदाने रडवले अन् पावसाने हसवले! अशी अवस्था लाभक्षेत्रातील पिकांची झाली आहे.

गेल्या महिनाभरापासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे जोमदार उगवून आलेली खरिपातील पिके सुकू लागली होती. हवामानाच्या अभ्यासकांनी 16 ऑगस्टला पावसाचे भाकित वर्तविले होते. त्यानुसार पावसाने काल सहा वाजेनंतर जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी सहा वाजता तर काही ठिकाणी सात वाजता पावसाने हजेरी लावली. मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण राहाता तालुक्यात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. काही भागात एक भरणे झाल्याचे शेतकरी सांगतात.

अस्तगाव परिसरात काल सायंकाळी 7 वाजेनंतर अर्धा ते पाऊण तास पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.राहाता तालुक्याच्या जिरायती टापूतही पावसाने हजेरी लावली. तसेच पुर्व भागातही वाकडी परिसरात पावसाने हजेरी लावली. राहाता, शिर्डी परिसरातही पावसाने हजेरी लावली. नांदुर्खी भागातही पावसाने हजेरी लावल्याचे प्रगतिशील शेतकरी राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

पावसाने महिनाभर उघडीप दिल्याने जलसंपदा विभाग खरिपाचे तातडीने आवर्तन करील या हेतूने शेतकर्‍यांनी जलसंपदाकडे आवर्तनाची मागणी केली होती. शेवटच्या टप्प्यात जलसंपदाने पाणी मागणी अर्ज दाखल करण्यासाठी जाहीर प्रकटन काढून 14 ऑगस्ट ही अंतिम तारीख दिली होती. त्यामुळे आवर्तनाला उशीर होईल, म्हणून लाभक्षेत्रातील शेतकरी नाराज झाले होते. त्यातच काल एक भरणी होईल इतपत पाउस झाल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक परिसरातील धरणांच्या पाणलोटात काल सायंकाळी पाऊस नसल्याची माहिती आहे.

या पावसाने पिकांना तर फायदा होईलच पण अस्तगाव परिसरातील रोपवाटिकांना मोठा आधार मिळाला आहे. रोपे ही या पावसाने चांगली तरारली आहेत.

- संजय जेजूरकर, नर्सरी उद्योजक, अस्तगाव

जलसंपदा विभागाने शिवळ सांडली, पाटपाण्याची वाट पाहून डोळ्यांची खाचरं झाली. खरिपाची पिके करपयाला लागली होती. पण काल झालेल्या पावसाने शेतकर्‍यांची लाज राखली.खरिपाला नवसंजिवनी मिळाली. आता अजूनही वेळ गेलेली नाही जलसंपदाने निर्णय घेऊन लवकर सिंचनाचे आवर्तन द्यावे.

- राजेंद्र कार्ले, प्रगतिशील शेतकरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com