राहाता तालुक्यात अतिवृष्टीमुळे 427 घरे, 127 दुकाने, दोन हजार शेतकर्‍यांचे 956 हेक्टर पिकांचे नुकसान

राहाता तालुक्यात अतिवृष्टीमुळे 427 घरे, 127 दुकाने, दोन हजार शेतकर्‍यांचे 956 हेक्टर पिकांचे नुकसान

राहाता |वार्ताहर| Rahata

तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 427 घरे, 127 दुकाने तसेच 18 गावांतील 2003 शेतकर्‍यांची 956 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.

31 ऑगस्टपासून राहाता तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने अतिवृष्टीमुळे शेती पिकांची तसेच घरांची व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून राहाता तालुक्यात नुकसान झालेल्या परिस्थितीची पाहणी करून पंचनामे करण्याची कारवाई महसूल विभागाने सुरू केली आहे.

तालुक्यात लोणी खुर्द व बुद्रुक, राहाता, शिर्डी, हसनापूर या गावातील 427 घरांची तसेच 127 दुकानांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. तसेच हनुमंतगाव, पाथरे, भगवतीपूर, अस्तगाव, चोळकेवाडी, तरकसवाडी, आडगाव बुद्रुक व खुर्द, खडकेवाके, सावळीविहीर, लोणी बुद्रुक व खुर्द, गोगलगाव, दाढ बुद्रुक, दुर्गापूर, हसनापूर, चंद्रपूर, पिंपरी निर्मळ या 18 गावांतील दोन हजार 3 शेतकर्‍यांची 956 हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, मका व कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मागील दोन वर्षापासून करोनात सापडलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी मिळणार्‍या उत्पादनात काही प्रमाणात फायदा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु या आठवड्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिणामी अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडतो की काय? अशी भिती शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना लागली आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ.सुजय विखे पाटील हे तालुक्यात नुकसान झालेल्या ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करीत आहेत.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून राहाता तालुक्यातील नुकसान झालेल्या घरांची, दुकानची तसेच शेतीची पाहणी करून पंचनामे करण्याची कारवाई सुरू झाली आहे. ज्या नागरिकांचे नुकसान झाले, त्यांनी आपापल्या गावातील तलाठी कार्यालयात नुकसानग्रस्तांची यादी तपासून पहावी.

-कुंदन हिरे, तहसीलदार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com