राहाता तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी पोट निवडणूक

राहाता तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी पोट निवडणूक

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील रीक्त झालेल्या सात ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांच्या निवडीसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीची अधिसुचना उद्या प्रसिध्द होणार आहे. तर दि. 21 डिसेंबर 2021 ला मतदान होणार आहे.

वेगवेगळ्या कारणांमुळे राहाता तालुक्यातील लोणी खुर्द, बाभळेश्वर, वाळकी, नांदुर्खी, गोगलगाव, हसनापुर, लोहगाव या सात ग्रामपंचायतीच्या रीक्त झालेल्या सात सदस्यांच्या निवडीसाठी पोट निवडणुक होत आहे. निवडणुकीसाठी सोमवारी 22 नोव्हेंबर रोजी तहसिलदारांकडुन नोटीस प्रसिध्द होणार आहे. उमेदवारांना 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंब पर्यत उमेदवारी दाखल करण्यासाठी मुदत आहे. 7 डिसेंबरला छाननी असुन 9 डिसेंबरपर्यत माघार घेता येणार आहे. आवश्यकता असल्यास 21 डिसेंबरला प्रत्यक्ष निवडणुक व 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

या ग्रांमपंचायतीच्या पोट निवडणुकांमध्ये लोणी खुर्द व बाभळेश्वर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका लक्षवेधी होण्याची शक्यता असुन इतर पाच गावात निवडणुका झाल्यातरी आ. विखे यांच्याच गटात होण्याची चिन्हे आहेत.लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे निवडणुकीत दोन जांगावर विजयी झाले होते. त्यांनी एका जागेचा राजीनामा दिल्याने रीक्त झालेल्या जागेवर येथे निवडणुक होत आहे. येथे सत्ताधारी सरपंच जनार्दन घोगरे व माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटात या एका जागेसाठी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. तर बाभळेश्वरमध्ये रिक्त झालेली जागा श्रीरामपूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के यांच्या गटाच्या ताब्यातील होती. येथेही रावसाहेब म्हस्के व आ.राधाकृष्ण विखे पाटील या दोन गटात सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com