
धनगरवाडी |वार्ताहार| Dhangarwadi
राहाता तालुका कृषी कार्यालयात कार्यालयीन कर्मचार्यांची शेतकरी बांधवांना कृषी यांत्रिकीकरणात काही तांत्रिक अडचण किंवा अन्य योजनेसंबंधी माहिती लागत आल्यास ती देण्यास तालुका कृषी खात्याची उदासिनता दिसुन येत आहे.
कृषीच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यासाठी शासनाने ऑनलाईन प्रणाली विकसित केल्याने यात पारदर्शकता निर्माण झाली आहे. तसेच यात मिळणारा लाभ हा शेतकर्यांच्या खात्यात जमा होत असल्याने गैरव्यवहारास लगाम बसला आहे. परंतु ऑनलाईन प्रणालित काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास किंवा बँक खात्यावर पैसे जमा होत नाहीत किंवा अन्य अडचणीस शेतकर्यास सामोरे जावे लागत असते.
यावेळी शेतकर्यांनी कृषी विभागाच्या कर्मचार्यांशी संपर्क साधल्यास त्यांना उडवाउडवीचे उत्तर मिळतात. तुम्ही डिलरला भेटा तुमचे अनुदान जमा झाले की नाही याचा आम्ही डिलरच्या गृपवरती मेसेज टाकलेला आहे. त्यांनी तुम्हाला सांगितले नाही का? आम्हाला माहिती वरती पाठवायची असल्याने आता वेळ नाही, अशी उत्तरे देत समोरच्याची बोळवण केली जाते. शासन कृषी विभागात विविध योजना राबवत असतांना या कर्मचार्यांच्या उदासिनतेतून लाभार्थी वंचित राहत असल्याने संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
केंद्र व राज्य सरकार शेतकर्यांसाठी विविध योजना राबवत असताना त्या प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी कृषि विभागाची आहे. शेतकरी यासंबंधी माहिती विचारण्यासाठी कृषि विभागात गेल्यास त्यांना समाधानकारक माहिती मिळत नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे. ही होणारी हेळसांड कृषि विभागाने थांबवावी अन्यथा तिव्र स्वरूपाचे अंदोलन छेडण्यात येईल.
- विठ्ठलराव शेळके, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना