राहाता तालुक्यात 165 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह!

करोनाचे निर्बंध मोडणारांवर कडक कारवाई- हिरे
राहाता तालुक्यात 165 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह!

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात 165 कोव्हिड रुग्ण अ‍ॅक्टिव आहेत. कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यात कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. सोमवार मध्यरात्रीपासुन हे निर्बंध अंमलात आले असुन हे निर्बंध मोडणारांवर कडक कारवाई करण्याचा इशारा तहलिसदार कुंदन हिरे यांनी दिला आहे. काल तालुक्यात 48 रुग्णांची भर पडली आहे.

तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाने जिल्हाधिकारी यांनी जिल्हाभरात निर्बंध जारी केले आहेत. राहाता तालुक्यातही निर्बंध जारी करण्यात आले आहेत. लसीकरणावर तालुक्यात भर देण्यात येत आहे, असे सांगुन श्री. हिरे म्हणाले, गेल्या 5-6 दिवसात रुग्णांची संख्या वाढली आहे. राहाता तालुक्यात या टप्प्यात करोनाने शंभरी पार केली आहे. 165 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. प्रवरा रुग्णालयाच्या करोना सेंटरमध्ये 30 हुन अधिक रुग्ण आहेत. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले त्यांना करोना झाला असला तरी सौम्य लक्षणे त्यांच्यात दिसुन येतात.

काहींच्यामध्ये लक्षणेच नाहीत, काही जण घरीच विलगीकरणात आहेत. जे होमक्वारंटाईन आहेत, त्यांनी इतरत्र फिरु नये, घरीच थांबावे, लसीकरणावर भर देण्यात येत आहे. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लस घ्यावी, ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांनी दुसरा डोसही घ्यावा. सध्या 15 ते 18 च्या पुढेही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे या वयोगटातील सर्वांनीच लस घ्यावी, आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे.

तालुक्यातील शाळा तसेच महाविद्यालये 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद राहातील. इयत्ता 10 व इयत्ता 12 वी चे विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक बोर्डाकडून राबवायचे उपक्रम, प्रशासकिय कामकाज, व शिक्षकांनी अध्यापना व्यतिरिक्त करावयाचे कामकाज. या बाबी वगळण्यात आल्या आहेत. लग्न समारंभासाठी 50 व्यक्ति, अंत्यविधिसाठी 20 व्यक्ति, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकिय कार्यक्रमांनाही कमाल 50 व्यक्तिंना परवानगी असेल. पत्येक कार्यालयात व्यावस्थापनाने थर्मल स्कॅनर, हँड सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावेत.

कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना, यांनी शासनाने जारी केलेले आदेशाचे उल्लंघन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता च्या कलम 188 नुसार दंडनिय, कायदेशीर कारवाईस पात्र ठरतील, असेही तहसिलदार कुंदन हिरे यांनी सांगितले. अस्तगाव, सावळीविहीर, कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या गावात काल एकही रुग्ण आढळून आलेला नाही. काल दुर्गापुर येथे 1, लोणी बु. 8, गोगलगाव 1, लोणी खुर्द 5, साकरी येथे 1, अडगाव बु. 1, जळगाव 1, असे राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात 19 रुग्ण आढळून आले. शिर्डी शहर 18, राहाता शहर 10 असे शहरी भागात 28 रुग्ण तर एक रुग्ण तालुक्या बाहेरील आहे. असे एकूण काल 48 रुग्णांची काल नोंद झाली.

सक्रीय रुग्ण असलेल्या गावांचे नाव व संख्या पुढील प्रमाणे- पिंपळस 4, बाभळेश्वर बु. 4, राजुरी, साकुरी, अडगाव बु., वाकडी, चितळी या पाच गावात प्रत्येकी 2 रुग्ण सक्रिय आहेत.तर पिंप्रीनिर्मळ, एकरुखे, दाढ बु., दुर्गापुर, गोगलगाव, कोल्हार बु. पुणतांबा या सात गावात प्रत्येकी एक रुग्ण सक्रिय आहे. तर शिर्डी ला 63, लोणी बु. ला 30, व राहाता येथे 25 रुगण सक्रिय आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com