राहाता तालुक्यात नवीन बाभळेश्वर जि.प. गट

अस्तगाव गण आता वाकडी गटात ! || निमगाव कोर्‍हाळे व पिंपरी निर्मळ गणांची निर्मिती
राहाता तालुक्यात नवीन बाभळेश्वर जि.प. गट

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात एक जिल्हा परिषद गटाची भर पडली आहे. पूर्वी 5 गट होते, आता 6 झाले आहेत. बाभळेश्वर हा नवीन जि.प. गट अस्तित्वात आला आहे तर पंचायत समितीचे निमगाव कोर्‍हाळे व पिंप्री निर्मळ हे दोन गण नव्याने अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे आता गटांची संख्या 6 तर गणांची संख्या 12 झाली आहे.

जिल्हा परिषदेचे आता पुणतांबा, वाकडी, साकुरी, बाभळेश्वर, लोणी खुर्द, आणि कोल्हार बुद्रुक हे गट असतील तर पुणतांबा गटात सावळीविहीर बुद्रूक व पुणतांबा हे दोन गण असतील. वाकडी गटात वाकडी व अस्तगाव गण, साकुरी गटात साकुरी व निमगाव कोर्‍हाळे हे दोन गण असतील. नव्याने अस्तित्वात आलेल्या बाभळेश्वर गटात पिंपरी निर्मळ व बाभळेश्वर हे दोन गण असतील. लोणी खुर्द गटात लोणी खुर्द व लोणी बुद्रुक हे दोन गण असतील. कोल्हार बुद्रूक गटात कोल्हार बुद्रूक व दाढ बुद्रूक हे दोन गण असतील.

पुणतांबा गट

पुणतांबा गटात आता पुणतांबा व सावळीविहीर हे पूर्वीप्रमाणेच असणार आहे. मात्र त्यातील गावे काही अंशी बदलण्यात आली आहेत. असे प्रत्येक गणात आणि गटात बदल झाले आहेत. हे प्रारुप रचनेवरुन दिसून येत आहे. पुणतांबा जि. प. मधील पुणतांबा गणात पुणतांबा, रास्तापूर, पिंपळवाडी, नपावाडी, रामपूरवाडी हे पाच गावे आहेत तर सावळीविहीर बुद्रूक गणात सावळीविहीर बुद्रूक, सावळीविहीर खुर्द, रुई, शिंगवे या गावांचा समावेश असेल.

वाकडी गट

जिल्हा परिषदेच्या वाकडी गटात आता वाकडी व अस्तगाव हे दोन गण आहेत. पूर्वी अस्तगाव गण साकुरी गटात होता. आता तो वाकडी गटात समाविष्ट करण्यात आला आहे. वाकडी गणात वाकडी, चितळी, जळगव, एलमवाडी, धनगरवाडी ही पाच गावे आहेत. तर अस्तगाव गणात अस्तगाव, एकरुखे, रांजणगाव खुर्द या गावांसह चोळकेवाडी, मोरवाडी, तरकसवाडी या वाड्यांचा समावेश आहे.

साकुरी गट

साकुरी गटात आता साकुरी व निमगाव कोर्‍हाळे हे दोन गण आहेत. निमगाव कोर्‍हाळे नव्याने गण निर्मिती झाली आहे. साकुरी गणात साकुरी, पिंपळस, दहेगाव कोर्‍हाळे, कोर्‍हाळे या चार गावांचा समावेश आहे. तर निमगाव कोर्‍हाळे गणात निमगाव कोर्‍हाळे, नांदुर्खी बुद्रूक, निघोज, डोर्‍हाळे, कनकुरी, नांदुर्खी खुर्द, वाळकी या गावांचा समावेश आहे.

बाभळेश्वर गट

बाभळेश्वर हा नवीन जिल्हा परिषदेचा गट तयार झाला आहे. बाभळेश्वर जि.प. गटात बाभळेश्वर व पिंपरी निर्मळ या दोन गणांचा समावेश असेल. बाभळेश्वर गणात बाभळेश्वर खुर्द, बाभळेश्वर बुद्रूक, राजुरी, नांदुर खुर्द, नांदुर बुद्रूक, रांजणखोल या 6 गावांचा समावेश असेल. पिंपरी निर्मळ गणात पिंपरी निर्मळ, केलवड बुद्रूक, केलवड खुर्द, पिंपरी लोकई, आडगाव खुर्द, आडगाव बुद्रूक, खडकेवाके, गोगलगाव या 8 गावांचा समावेश करण्यात आला आहे.

लोणी खुर्द गट

लोणी खुर्द जि.प. गटात लोणी खुर्द व लोणी बुद्रूक हे दोन पंचायत समितीचे गण आहेत. लोणी खुर्द गणात लोणी खुर्द व चंद्रापूर ही दोन गावे आहेत. तर लोणी बुद्रूक गणात लोणी बुद्रूक, लोहगाव, हसनापूर या गावांचा समावेश असेल.

कोल्हार बुद्रूक गट

कोल्हार बुद्रूक जि.प. गटात कोल्हार बुद्रूक व दाढ बुद्रूक या दोन गणांचा समावेश असेल. त्यापैकी कोल्हार बुद्रूक गणात कोल्हार बु., तिसगाव, ममदापूर या तीन गावांचा समावेश आहे. तर दाढ बुद्रूक गणात दाढ बुद्रूक, भगवतीपूर, पाथरे बुद्रूक, हनुमंतगाव, दुगापूर या गावांचा समावेश असेल.

राहाता तालुक्याच्या गणेश परिसरात तीन गट व सहा गण आहेत तर प्रवरा परिसरात तीन जि.प. गट व 6 पंचायत समिती गण आहेत. जुन्या जि.प. गटात व पंचायत समिती गणात काही अंशी बदल झाले आहेत. नवीन एक जि.प. गट व 2 पंचायत समिती गणांमुळे हे बदल झाले आहेत. गट आणि गण रचनेमुळे काही गम तर कही खुशी अशी स्थिती निर्माण झाली आहे.

आमदार विखे यांचा प्रभाव !

विधानसभेच्या कोपरगाव मतदार संघात राहाता तालुक्यातील पुणतांबा व वाकडी गट येतात. त्यात शिर्डी मतदार संघातील काही गावे जोडली गेली आहेत. वाकडी गटाला शिर्डी मतदार संघातील अस्तगाव गण जोडण्यात आला आहे. यापूर्वीही या गटाला बाभळेश्वर गण जोडलेला होता. या दोन्ही गटात विखे पाटील विरुध्द काळे, कोल्हे अशी प्रमुख गटात संघर्षाची चिन्हे आहेत. राहाता तालुक्यात या सहा गटात व 12 गणात आमदार विखे पाटील यांचा प्रभाव आहे. मागील संपूर्ण गट व गणात त्यांचेच सदस्य होते.

राहाता तालुक्यातील या गट व गणांची प्रारुप प्रभाग रचना यादी काल प्रसिध्द करण्यात आली. या गट व गणांच्या रचनेवर कुणाची हरकत असल्यास त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडे दि. 8 जून 2022 किंवा तत्पुर्वी लेखी सादर कराव्यात त्यानंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com