राहाता तालुक्यात काही गावांमध्ये मुसळधार

रांजणगावला 118 मिमी पाऊस, पिके पाण्यात, बंधारे निम्मे भरले
राहाता तालुक्यात काही गावांमध्ये मुसळधार

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील रांजणगावसह इतर भागात सोमवारी रात्री 11.30 नंतर मुसळधार पाऊस झाला. रांजणगावात तब्बल 118 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले.

यंदाच्या हंगामातील हा पहिलाच धुव्वाधार पाऊस झाला. सोमवारी सायंकाळी 10 वाजता विजेच्या कडकडाट सुरु झाला. मुसळधार पावसाची वर्दी देत पावसाला एक ते दीड तासात मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. हा पाऊस अडीच ते तीन तास टिकून होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. मध्यम स्वरूपाचा पाऊस पहाटे चारपर्यंत टिकून होता. मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले.

राहाता तालुक्यात या हंगामातील हा सर्वात मोठा पाऊस झाला. रांजणगाव व परिसरात 118 मिमी पावसाची नोंद झाली. राहाता येथे 50 मिमी, शिर्डीला 35 मिमी, चितळी 85 मिमी असा पाऊस नोंदला गेला. अस्तगाव, वाकडी भागातही पावसाने मुसळधार हजेरी लावली. अस्तगावचे ओढे या हंगामात पहिल्यांदा वाहिले. अनेक शेतात पाणी साठले. सोयाबीन तसेच इतर उभी पिके पाण्यात होती. अस्तगाव, रांजणगाव भागात जोरदार पाऊस झाल्याने हे पाणी एकरूखे भागात वाहून गेल्याने तेथील तळे तुडूंब भरले. यापूर्वीच्या पावसाने रस्त्याच्या कड़ेचे साईड गटारात पाणी साठले नव्हते. मात्र या पावसाने रस्त्याच्या कड़ेचे सर्व साईड गटार तसेच छोटे मोठे डबके तुडूंब भरले आहेत.

या पावसाने विहिरी, इंधन विहिरींना पाणी वाढू शकेल. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही भागातील बंधारे तुडूंब झाल्याने जलसंपदा विभागवर ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यावर फार ताण येणार नाही.

हा पाऊस राहाता तालुक्यातील सर्व गावात सारखा नाही. तालुक्याच्या पश्चिम भागात मात्र पावसाचे प्रमाण कमी आहे. आडगावचे बेंद वस्ती भाग, पिंप्री निर्मळ, अस्तगाव, चोळकेवाडी, रांजणगाव, एकरूखे, वाकडी, चितळी या परिसराला पावसाने चांगलेच झोडपले. या परिसरातील काही बंधारे निम्मे भरले आहेत. शेतातील कोपरे (बांधणी) भरले आहेत. काही ठिकाणी बांधणी तुटून नुकसान झाले. अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. अजून एखादा या स्वरूपाचा पाऊस झाल्यास सर्व बंधारे ओव्हरफ्लो होतील, अशी शेतकर्‍यांना आशा आहे. दरम्यान अनेक ठिकाणी सोयाबीन काढणीस आली आहे. जोमदार आलेले सोयाबीनला चांगल्या शेंगा लगडल्या आहेत. या शेंगा पाण्यात बुडाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे असे शेतकरी काळजीत आहेत.

Related Stories

No stories found.