अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर राहाता सोसायटी निवडणूक बिनविरोध

आमदार राधाकृष्ण विखे यांची निर्णायक भूमिका
अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर राहाता सोसायटी निवडणूक बिनविरोध

राहाता |वार्ताहर| Rahata

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर राहाता सोसायटी निवडणूक आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्णायक भूमिकेमुळे बिनविरोध करण्यात आली.

एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत निवडणुकीच्या आखाड्यात आपले राजकीय वर्चस्व दाखवण्याकरिता रणशिंगे फुंकले. आ. विखे-पाटील यांच्या दोन्ही गटाने आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नरमाईची भूमिका घेतल्याने राहाता सोसायटी निवडणूक बिनविरोध झाली.

राहाता पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायटी निवडणूक अनेकांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत आपली राजकीय ताकद दाखवून आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून शाबासकीची थाप मिळवण्याकरिता व्यूहरचना करत दोन्ही गटाने डावपेच आखण्यास सुरुवात केली होती. परंतु आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेवरून सोसायटी निवडणूक बिनविरोध झाल्याने श्री गणेश जनसेवा मंडळाकडून भास्कर दामोदर सदाफळ, वंदना दादासाहेब बोठे, बाळासाहेब बाबुराव सदाफळ, गोरक्षनाथ निवृत्ती लांडगे, स्वप्निल कारभारी गाडेकर, मंदाकिनी काशिनाथ बोठे, सुरेश सुखदेव गाडेकर, राजेंद्र भागवत धुमसे तर सहकार पॅनलकडून मोहन रंगनाथ गाडेकर, वीरेश जानबा बोठे, विष्णु प्रभाकर सदाफळ, लताबाई ज्ञानेश्वर गाडेकर, बाबासाहेब गणपत पाळंदे असे एकूण 13 सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत गणेशचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ व अ‍ॅड. नारायण कार्ले, भाऊसाहेब सदाफळ या दोन गटात चुरशीची लढत बघायला मिळाली होती. चेअरमन मुकुंदराव सदाफळ यांच्या गटाने मागील निवडणुकीत बाजी मारत सर्वच 13 जागांवर विजय मिळवला होता.

13 जागेकरता 47 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यात श्री गणेश जनसेवा मंडळाकडून 32 तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या सहकार पॅनलकडून 15 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 20 मे ठेवण्यात आली होती. निवडणूक बिनविरोध व्हावी असे शहरातील बहुदा सभासद व आ. विखे पाटील यांच्या समर्थकांचे म्हणणे होते.

या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच समर्थकांनी एकमेकाच्या आमने सामने निवडणुकीच्या रिंगणात दंड ठोपटल्याने दोन्ही गटाकडून सोसायटी निवडणुकीत एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत मोठा संघर्ष निर्माण होऊन त्याचे पडसाद येणार्‍या नगर परिषदेच्या निवडणुकीत उमटतील असे चित्र निर्माण होऊ नये याकरिता काही समर्थकांनी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना सोसायटी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली.

आ. विखे पाटील यांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचे व उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेण्याकरिता शिर्डी येथे बैठक आयोजित केली. या बैठकीत आ. विखे पाटील यांच्यासमोर दोन्ही गटाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आपल्या मनातील असलेल्या गोष्टींची उकल मांडली. आ. विखे पाटील यांनी दोन्ही गटाचे म्हणणे ऐकून घेऊन तुम्ही जागा वाटपाचा निर्णय घेऊन मला दोन दिवसात सांगा, अशा सूचना केल्या. परंतु दोन्ही गटात जागा वाटपावरून एकमत होत नव्हते. दोन्ही गटात एकमत होत नसल्याने सोसायटी निवडणूक होईलच असे अनेकांना वाटू लागले होते.

अखेर आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन्ही गटातील नेतृत्व करीत असलेल्या कार्यकर्त्यांना 8-5 फॉर्म्युला वापरून निवडणूक बिनविरोध करा अशा सूचना केल्याने सत्ताधारी गटाच्या श्री गणेश जनसेवा पॅनलला 8 जागा तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या सहकार पॅनेलला 5 जागा देण्यात येऊन राहाता सोसायटी निवडणूक बिनविरोध करण्यात आली. सोसायटी निवडणूक बिनविरोध झाल्याने आ. विखे-पाटील यांच्या दोन्ही गटातील संघर्ष तुर्त थांबला. दोन्ही गटातील नेत्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरीता त्यांची मनधरणी करण्याकरिता मोठी कसरत करावी लागली.

आता चेअरमन, व्हाईस चेअरमन होण्याकरिता कोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्री गणेश जनसेवा मंडळाकडून गणेशचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, सोपानराव सदाफळ, भास्करराव सदाफळ, नानासाहेब बोठे, भाऊसाहेब जेजुरकर, संजय सदाफळ, ज्ञानेश्वर सदाफळ, अंबादास गाडेकर, गंगाधर बोठे, राहुल सदाफळ, सागर सदाफळ, गणेश बोरकर तर सहकार पॅनेलकडून अ‍ॅड. नारायण कार्ले, मोहनराव सदाफळ, भाऊसाहेब सदाफळ, कैलास सदाफळ, भागुनाथ गाडेकर, भगवान टीळेकर, सुरेश सदाफळ, अनिल बोठे, साहेबराव गाडेकर, बाळासाहेब गिधाड यांनी नेतृत्व केले. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक अनुप कदम यांनी निवडणूक बिनविरोध होण्याकरिता मोलाची भूमिका बजावली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com