
राहाता |वार्ताहर| Rahata
उद्धव ठाकरे गटाच्या नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडीमध्ये निष्ठावंत शिवसेना पदाधिकार्यांना डावलून माजीमंत्री बबनराव घोलप यांनी त्यांच्या मर्जीतील पदाधिकार्यांची निवड केल्यामुळे संतप्त ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत घोलप यांचा निषेध व्यक्त केला.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील सर्व आजी माजी जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमु, शहर प्रमुख, विभाग प्रमुखांनी रविवारी सायंकाळी राहाता शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात बैठक घेऊन घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सांगितले की, नुकतेच नवीन जिल्हा कार्यकारणीचे निवड झाली. परंतु ती निवड करत असताना सर्व आजी-माजी कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विश्वास न घेता अयोग्य निवड झाल्याची भावना निष्ठावंत सैनिकांमध्ये चर्चा आहे.
काही महिन्यांपूर्वी घोलप यांनी हीच कार्यकारिणी जाहीर केली होती. परंतु शिर्डी लोकसभा मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकांच्या प्रचंड विरोधा नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कार्यकारिणीला स्थगिती दिली होती. परंतु माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पक्ष श्रेष्ठींची दिशाभूल करून पक्षप्रमुखांना वेठीस धरून आजी माजी कार्यकर्ते व पदाधिकारी निष्ठावंत शिवसैनिकांचे कुठल्याही प्रकारे जनमत जाणून न घेता व कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता स्वतःच्या मर्जीतील पदाधिकार्यांची निवड केली आहे.
यामुळे शिर्डी मतदार संघामध्ये संपर्क नेतेच गटबाजीला प्रोत्साहन देत आहेत अशी संतप्त शिवसैनिकांची प्रतिक्रिया या मतदार संघात उमटत आहे. यामुळे शिर्डी मतदार संघात विजयी होणारी जागा धोक्यात येऊ शकते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये घोलप फिरकले सुद्धा नाहीत. तर नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी प्रचार सुद्धा केला नाही.
यावेळी मतदारसंघातील सहा तालुक्यातील ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यांचे भाषणे झाली. यावेळी संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप यांचा निषेध व्यक्त केला व जिल्ह्यातील सर्व निष्ठावंत शिवसैनिक व पदाधिकारी हे लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सर्व शिवसैनिकांच्या भावना व्यक्त करणार आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, माजी तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप साळकट, माजी नगरसेवक राजेंद्र अग्रवाल, माजी शहरप्रमुख गणेश सोमवंशी माजी शहरप्रमुख फुल सौंदर दंडेयाल माजी शहर प्रमुख सचिन बडदे, दीपक ताक, अमोल खापटे, गोरख वाकचौरे, शेखर जमदाडे, रामहरी निकाळे, प्रमोद मंडलिक, नवनाथ शेटे, संजय साबळे, राम सहानी, नामदेव आवारे, भाऊसाहेब गोरडे, हरिभाऊ शेळके, मच्छिंद्र म्हस्के, बाळासाहेब देशमुख, सुदेश मुर्तडक, बाळासाहेब लहांगे, बाळासाहेब जाधव, पप्पू कानकाटे, अमोल कवडे, दिगंबर सहाने यांसह आदी निष्ठावंत ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेच्या निष्ठावंत पदाधिकारी यांच्यावर झालेल्या अन्यायप्रकरणी सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, खा. अनिल देसाई ,खा. विनायक राऊत यांनी या प्रकरणात लक्ष घालून सत्यता जाणून घ्यावी तसेच निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय मिळवून देण्याकरिता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणावी.
- गणेश सोमवंशी, माजी शिवसेना शहर प्रमुख राहाता