
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
राहाता तालुक्यातील जनतेला गुलामगिरीत ढकलणार्यांच्या विरोधात आपली लढाई आहे. पैसा आणि दहशतीचा वापर करून येथील जनतेला वर्षानुवर्षे गुलामीत टाकणार्यांना जनतेची ताकद दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. जनतेपर्यंत जा, त्यांच्यात जागृती करा. ही लढाई आपल्याला जनतेला सोबत घेऊनच लढायची आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
राहाता तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रमुख पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ. थोरात बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महासचिव उत्कर्षा रूपवते, डॉ. एकनाथ गोंदकर, तालुकाध्यक्ष अॅड. पंकज लोंढे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. शिर्डी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी सचिन चौगुले यांच्या निवडीची घोषणा यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केली. आ. थोरात यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन चौगुले यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
आ. थोरात म्हणाले, मी राहात्यात येतो ते चांगले करण्यासाठी. जनतेच्या मनात येथे बदल घडावा अशी सुप्त इच्छा आहे. बाजार समितीची निवडणूक असो किंवा गणेश कारखान्याची निवडणूक जनतेने आपली भावना मुक्तपणे बोलून दाखवली आहे. धनसत्तेच्या विरोधातील ही लढाई लढताना जनता आपल्यासोबत आहे. हत्ती कितीही मोठा असला तरीही मुंगी त्याला नाचवू शकते, पराभूत करू शकते हे कोणीही विसरू नये. वर्षानुवर्षे धाक दाखवून या तालुक्यातील जनतेला गुलाम बनविण्याचे काम येथील नेतृत्वाने केलेले आहे, आपल्याला ती गुलामगिरी संपवायची आहे.
नागवडे म्हणाले, जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून राहत्यातल्या विविध गावांमध्ये पोहोचलेल्या राहाता तालुका काँग्रेस कमिटीचे मी कौतुक करतो. काँग्रेसचा विचार हा जनसामान्यांचा विचार आहे, जनतेला भारतीय जनता पक्षाचा फोलपणा लक्षात आलेला आहे. त्यामुळे आपण लोकांकडे पोहोचले पाहिजे, त्यांची दुःख आणि वेदना समजून घेतली पाहिजे.
डॉ. गोंदकर म्हणाले, सध्या संस्थानमार्फत शिर्डी बाहेर मंदिर बांधणे किंवा जागा घेणे अशा संदर्भातली काही चर्चा सुरू आहे, मात्र आम्ही शिर्डीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन या सर्व गोष्टींना विरोध केला आहे. हे सर्व करण्यापेक्षा इथेच भाविकांना अधिकाधिक सुविधा कशा देता येतील यावर काम होणे आवश्यक आहे. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पंकज लोंढे यांनी जनसंवाद यात्रेचा आढावा दिला.
भाविकांच्या असुविधेचा प्रश्न विधानसभेत मांडणार
दर्शन रांगेचे काम होऊन काही महिने उलटलेले आहे. शैक्षणिक संकुलही तयार आहे. या सर्व सुविधांचे वेळेत लोकार्पण झाले तर भाविकांनाच त्याचा फायदा होईल. मात्र केवळ उद्घाटनाच्या हट्टापायी त्या सुविधा खुल्या केल्या जात नाहीत. डॉ. एकनाथ गोंदकर यांनी सुद्धा या संदर्भाने शासनाला प्राणांतिक उपोषणाचा इशारा दिला आहे. मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परिसराची भावना कळवणार आहे. याशिवाय विधानसभेत सुद्धा, हे विषय मी आग्रहाने मांडेल, असे आ. थोरात यांनी सांगितले.