पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

पिंपरी निर्मळ परिसरात अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या राहाता शिर्डी बाह्यवळण रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास सव्वाबारा कोटीची निविदा

काढल्यामुळे बाह्यवळण रस्ताच्या पहिल्या सहा किमी व शेवटच्या एक किमी अशा सात किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. पिंपरी निर्मळ ग्रांमस्थामधून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.

सरकारने कोल्हार-कोपरगाव चौपदरी रस्ता तसेच राहाता शिर्डी शहरातील जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पिंपरी निर्मळ ते सावळीविहीर असा 23 किमीचा रस्ता सुप्रीम या खासगी कंपनीच्या माध्यमातून केला होता. या बाह्यवळण रस्त्याची अवस्था अंत्यत बिकट झाली असून डांबर निघुन गेले आहे.

रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. धुळीमुळे बाजूचे रहिवासी व ग्रामस्थ बेजार झाले असून धुळीमुळे फळबागांसह पिकांचे मोठे नुकसान होत आहे. खड्ड्यामुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती व्हावी ही मागणी प्रवाशांसह शेतकरी व रहिवाशांमधून होत आहे. यासाठी स्थानिक शेतकर्यांनी वारंवार आंदोलने केले होते.

दैनिक सार्वमतने याबाबत वारंवार वृत्त प्रसिध्द केले होते. या सर्वांची दखल घेत माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या बाह्यवळण रस्त्याच्या पिंपरी निर्मळ कडील बाजूच्या सहा किलोमीटर व निमगाव येथील शेवटच्या एक किलोमीटर अशा सात किलोमीटरच्या कामासाठी सा. बां. विभागाने बारा कोटी 19 लाखांची निविदा प्रसिध्द केली आहे.

बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता संजय साबळे यांच्या माहितीनुसार पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.शासनाकडून या बाह्यवळण करिता निधी मिळाल्याने शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत असून कामाचा मागील अनुभव पाहता बांधकाम विभागाने चांगला ठेकेदार नेमून रस्त्याचे काम दर्जेदार करावे, अशी मागणी ग्रामस्थ रहीवाशी व प्रवांशामधून होत आहे.

एका रस्त्याला तिन वाली

सुरुवातीला नगर-कोपरगावसह बाह्यवळण रस्ता जागतिक बँक प्रकल्याकडे होता. मात्र आता नगर सावळीविहीर हा मुख्य रस्ता केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाला असून बाह्यवळणचा 23 किमी रस्ता दोन विभागात विभागला आहे. पिंपरी निर्मळपासून सहा किमी व शेवटचा एक किमी असा सात किमी रस्ता दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला असून उर्वरीत काम पुर्ण असलेला बाह्यवळण रस्ता जागतिक बँक प्रकल्पाकडेच आहे.