VIDEO : शिंगवेत बिबट्यांचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये दहशत

पिंजरा लावण्याची मागणी
VIDEO : शिंगवेत बिबट्यांचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये दहशत

मुंबई | Mumbai

राहाता तालुक्यातील शिंगवे येथे हरिहर गोविंद आश्रमालगत दोन बिबटे गुरुवारी सकाळी शेतकरी कैलास बाभुळके, उत्तम ठोंबरे यांनी आपल्या शेतात जात असताना अचानक समोर दिसल्यामुळे त्याची धांदल उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून वन विभागाने तात्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शिंगवे गावाजवळ हरिहर गोविंद आश्रम असल्याने येथे विविध कार्यक्रमांचे नेहमी आयोजन होत असते. येथे मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायातील भाविकांची वर्दळ असते. नेमका याच परिसरात दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याचप्रमाणे शिंगवे परिसरातील इतर वस्त्यांवरही बिबट्याचे दर्शन झाल्याचे तसेच कुत्री व शेळ्या फस्त केल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी अण्णासाहेब काळवाघे यांनी केली आहे.

एक महिन्यापूर्वी वारी रस्त्यालगत सुनील चौधरी यांच्या वस्तीवर बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला. दिपक ठोंबरे यांच्या वस्तीवरील पाळीव कुत्रे गायब झाले. बाभुळके, वाडगे वस्ती, शिंगवे- रस्तापूर शीव रस्ता, शिंगवे- पिंपळवाडी रोड, बाभुळके-लासुरे वस्तीकडे बिबट्याचा मुक्त संचार असल्याचा दावा येथील रहिवाशांनी केला आहे.

शेतकरी व मोलमजुरी करणारे महिला तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात पिंजरा लावुन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जाकिर शेख, बाळासाहेब ठोंबरे, उध्दव ठोंबरे, विजय बाभुळके, गणेश खेडकर, भगवान महाराज शास्त्री, किशोर काळवाघे, सुभाष ठोंबरे, उमेश काळवाघे, सचिन शेळके, देवानंद बाभुळके, केशव कोळसे, माजी उपसरपंच नानासाहेब काळवाघे, सोपान नरोडे, नारायण पगारे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com