राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील 78 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांपैकी अवघ्या नऊ शाळा सुरू झाल्या असून शिक्षकांचे कोव्हिड चाचणीचे अहवाल न आल्याने 70 शाळा बंद आहेत.

राज्यातील 9 वी ते 12 वी या शाळा सरकारने घालून दिलेल्या नियमात सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर राहाता तालुक्यात 78 शाळांपैकी अवघ्या नऊ शाळा सुरू झाल्या असून त्यातही अंशत: विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून येत आहे. या सर्व शाळांतील 518 शिक्षकांनी स्वतःची कोव्हिड चाचणी केली असून अद्याप 70 शाळांमधील शिक्षकांचे कोव्हिड चाचणी अहवाल येणे बाकी आहे. सुरू झालेल्या 9 शाळांमधील 735 पालकांनी विद्यार्थ्यांना संमती पत्र दिले आहेत.

कोव्हिड चाचणी अहवाल मिळण्यास उशीर होत असल्याने शाळा सुरू होण्यास विलंब होत असल्याचे सर्वच शाळा मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. शाळेतील शिक्षकांचे करोना अहवाल आल्यानंतरच सदर शाळा सुरू केल्या जातील. तालुक्यातील राजुरी, बाभळेश्वर, चितळी, दुर्गापूर, ममदापूर, पुणतांबा, लोणी व आडगाव या गावांतील प्रत्येकी एक शाळा सुरू झाली असून प्रमुख महाविद्यालये बंद असल्याने लाखो विद्यार्थी अद्याप घरीच आहेत.

पिंपळवाडी येथील एका शिक्षकाचा अहवाल पॉझीटिव्ह आला आहे तर निर्मळ पिंप्री येथील शाळा काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. ज्या शाळांची पूर्ण तयारी झाली तसेच सर्व शिक्षकांचे अहवाल प्राप्त होताच ती शाळा सुरू केली जाईल, अशी माहिती तालुका गटशिक्षणाधिकारी काळे यांनी दिली.

वाढत्या करोनामुळे पालकही चिंतेत असून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास धजत नाही. कॉलेजमधील विद्यार्थी घरूनच ऑनलाईन शिक्षण घेणे पसंत करताना दिसत असले तरी ग्रामीण भागातील ज्या गरीब विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही किंंवा नेटवर्कच्या अडचणीमुळे ते ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत.