राहाता ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्र हलवावे

राहाता ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्र हलवावे

पशुवैद्यकीय केंद्रात सुरु करा- मनसे

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता ग्रामीण रुग्णालयात कोविड तपासणीसाठी पेशंट येतात. याशिवाय लसीकरण करुन घेण्यासही नागरिक गर्दी करतात. त्यामुळे करोना वाढण्याची भिती मनसेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. लसीकरण केंद्र ग्रामीण रुग्णालयातून हालवून शहरातील मोकळे असलेले पशुवैद्यकिय केंद्रात सुरु करण्याची मागणी मनसेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विजय मोगले, राहाता तालुकाध्यक्ष राजेश लुटे यांनी एका निवेदनाद्वारे तहसिलदार कुंदन हिरे यांच्याकडे केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राहाता शहर व तालुक्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक रुग्णांना वेळेत बेेड, ऑक्सिजन, इंजेक्शन उपलब्ध होत नाही. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला घेवून मोठी भटकंती करावी लागत आहे. यात अनेक रुग्णांचा जीव गेला असल्याचे बोलले जात आहे. राहाता शहरात असलेले खाजगी कोविड रुग्णालयसुध्दा वाढत्या रुग्णसंख्येमुळे लगेच भरुन जात आहेत.

त्यामुळे तेथेही बेड शिल्लक राहत नाहीत. शिर्डी येथेही अनेकदा बेड उपलब्ध होत नाहीत. तालुक्यात कुठेच बेड मिळत नसल्याने नातेवाईकांना खराब परिस्थितीत रुग्णाला घेवून धावपळ करावी लागते. तसेच राहाता ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी सुध्दा दिवसेंदिवस मोठी गर्दी होत आहे. 1 मे नंतर या लसीकरणाच्या गर्दीत सुध्दा मोठी वाढ होईल. ग्रामीण रुग्णालयात करोना चाचणीकरिता होणारी तसेच इतर आजारासाठी येणारे (नॉन कोविड) व लसीकरणासाठी येणारे अशा तीनही प्रकारच्या नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही परिस्थिती बदलण्याकरिता लसीकरण राहाता शहरातील शासकीय पशुवैद्यकिय दवाखान्याच्या इमारतीमध्ये सुरु करावे म्हणजे तेथे नागरिकांना सुध्दा करोना नियमांचे पालन करणे अधिक सोपे होईल. लसीकरण व चाचणीसाठी स्वतंत्र जागेत व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com