राहाता तालुक्यात पावसाची धरसोड

दारणा, गंगापूरच्या पाणलोटात पावसाने फिरविली पाठ
राहाता तालुक्यात पावसाची धरसोड

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

धरणांच्या पाणलोटात पावसाने पाठ फिरविली आहे. काल सायंकाळी राहाता तालुक्यात पावसाने धरसोड केली आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली आहे. काही ठिकाणी पडतो तो 25 मिमीच्या आत पडतो. निव्वळ वातावरण तयार होते, परंतु तो बरसत नाही. त्यामुळे धरणांचे पाणी साठे स्थिर आहेत. कोपरगाव, राहाता तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या नजरा नाशिकच्या धरणांच्या पावसावर खिळुन आहेत.

गंगापूर धरणात महिनाभरात 10 टक्के पाणी साठा कमी झाला आहे. 43.62 टक्क्यांवरून हे धरण 33 टक्क्यांवर आले आहे. तब्बल 10 टक्के घट गंगापूरच्या साठ्यात झाली आहे. नाशिक शहरातील पिण्याच्या पाण्याच्या वापरामुळे पाणी घटले आहे. तर दारणाचा साठा 1 जून रोजी 19.29 टक्के होता. मध्यंतरी या धरणाच्या पाणलोटातील घाटमाथ्यावर चांगला पाऊस पडल्याने हे धरण 45 टक्क्यांवर पोहोचले होते. दोन टिएमसी पाणी नव्याने दाखल झाले. या धरणाचा साठा गेल्या आठ दिवसांपासून स्थिर आहे. भावलीचा साठा 14.91 टक्के होता.

मध्यंतरी पाऊस चांगला झाल्याने भावलीचा साठा वाढला. तो 47 टक्क्यांवर पोहोचला. आता पावसाअभावी साठा स्थिर आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भावलीच्या भिंतीजवळ 35 मिमी पाऊस झाला. तेथे 1 जून पासून काल सकाळपर्यंत 1004 मिमी पावसाची नोंद झाली. 1 जून पासून या धरणात अर्धा टिएमसीहून अधिक (591 दलघफू) नवीन पाणी दाखल झाले. नाशिक जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा हे धरण दरवर्षी भरते. परंतु पावसाने यावर्षी पाणलोट क्षेत्राकडे कानाडोळा केल्याचे जाणवते. मात्र उशीरा का होईना धरण पूर्ण क्षमतेने भरतात, असा यापुर्वीचा अनुभव आहे.

काल सकाळी 6 वाजता मागील संपलेल्या 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 5 मिमी, इगतपुरी 40 मिमी, घोटी 21 मिमी, वाकी 16 मिमी, गंगापूर 3 मिमी, भोजापूर 80 मिमी, कडवा 2 मिमी तर गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील कोपरगावला 13 मिमी, ब्राम्हणगाव 3 मिमी, कोळगाव 10 मिमी, सोनेवाडी 24 मिमी, शिर्डी 55 मिमी, राहाता 40 मिमी, रांजणगाव 28 मिमी, चितळी 17 मिमी असा पाऊस नोंदला गेला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com