राहाता तालुक्यात पावसाची दमदार बँटीग
सार्वमत

राहाता तालुक्यात पावसाची दमदार बँटीग

जून, जुलैमध्ये सरासरीच्या 186 टक्के पाऊस

Arvind Arkhade

पिंपरी निर्मळ|वार्ताहर| Pimpari Nirmal

मान्सूनच्या पावसाने चालु वर्षी दमदार बॅटीग केली आहे. राहाता तालुक्यात जुन, जुलै या दोन महिन्यात पाच महसुल मंडळे मिळुन सरासरी 220 मिमी पाऊस पडतो मात्र चालु वर्षी दोन महीन्यात सरासरीच्या 186% म्हणजेच 366 मी.मी. विक्रमी पाऊस झाला आहे. त्यामुळे भुगर्भातीला पाणी पातळी वाढण्यास जरी मदत झाली असली तरी खरीपांच्या कोवळ्या पिंकाना मात्र फटका बसला आहे.

राहाता तालुक्यात बाभळेश्वर, लोणी, राहाता, शिर्डी, पुणतांबा अशी पाच महसुल मंडळे मिळुन जुन ते ऑक्टोबर या पावसाळ्याच्या महिन्या दरम्यान सरासरी 440 मिमी पाऊस होतो. तर जुन मध्ये सरासरी 123 मिमी व जुलै मध्ये 97 मिमी सरासरी पाऊस होतो. चालु वर्षी मान्सुनच्या पावसाने दमदार आगमन केल्याने जुनमध्ये 214 मिमी व जुलैमध्ये 152 मिमी पाऊस झाला असुन या दोन महिन्यात सरासरी 366 मिमी पाऊस झाला आहे.

पुणतांबा मंडळात 472 मिमी सर्वाधीक पावसाची नोंद झाली असुन त्याखालोखाल लोणी मंडळात 386 मिमी, राहाता 368 मिमी, बाभळेश्वर 316 मिमी, शिर्डी 285 मिमी, पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 2019 मध्ये जुनमध्ये 79 मिमी, व जुलैमध्ये 69 मिमी, अशी 148 मिमी सरासरी पावसाची या दोन महिन्यांमध्ये नोद झाली होती. मात्र चालुवर्षी मान्सुनच्या दमदार आगमनामुळे दोन महिन्यात 366 मिमी पाऊस झाला असुन झालेला पाऊस वार्षीक सरासरीच्या 186% झालेला आहे.

तालुक्यात सरासरी 440 मिमी पाऊस पडतो. पुणतांबा मंडळात दोन महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली आहे. गेल्या वर्षी सुरवातीला पावसाने ताण दिला होता. मात्र परतीच्या पावसाने थैमान घातले होते. सोगंणीस आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला होता. चालु वर्षी पेरणीपासुनच पावसाच्या दमदार बँटीगमुळे अनेक ठिकाणी कोवळी खरीपाची पिके सडल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली.

सध्याही पानथळीच्या व ओढ़्याजवळील शेतजमीनी उपळल्यामुळे यातील खरीपाची पिके सडली आहेत. चालु वर्षी दोन महिन्याच्या साठ दिवसांपैकी सत्तावीस दिवस पावसाने हजेरी लावली. सततचा पाऊस व आर्द्रता यामुळे डाळींबांच्या फळांची मोठया प्रमाणात गळ झाल्याने शेतकर्‍यांना मोठया नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. या दमदार पावसामुळे खरिपाला काही प्रमाणात फटका बसला तरी रब्बीच्या पिंकाना मोठा आधार होणार आहे.

विक्रमी पाऊस होवून फळबांगाचे नुकसान होवुनही तालुक्यातील पेरू व डाळींब फळबांगाना विमा मिळणे अवघड आहे. डाळींबाच्या विमा परताव्यासाठी सलग पाच दिवस 25 मिमीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षीत आहे. तसेच पेरूच्या विमा परताव्यासाठी सलग चार दिवस 50 मिमीपेक्षा जास्त पाऊस होणे अपेक्षीत आहे. काही मंडळात दोन ते तिन दिवसातच सव्वाशे मिमीच्या वर पाऊस झाला. मात्र विमा कंपनीच्या फायद्यासाठी बदलण्यात आलेल्या ट्रीगरमुळे शेतकर्‍यांचा घात केला आहे. पुर्वीप्रमाणे आठवड्यातील एकत्रीत पाऊस मोजला जाणे आवश्यक आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com