राहाता तालुक्यातील प्राथमिक शिक्षक कोव्हिड रुग्णांच्या मदतीसाठी सरसावले!

राहाता तालुक्यातील प्राथमिक शिक्षक
कोव्हिड रुग्णांच्या मदतीसाठी सरसावले!

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

करोनाचे तांडव सुरुच असताना त्यावर उपचाराचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

या गरजू आणि गरीब रुग्णांना मदत करण्यासाठी राहाता तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सरसावले आहेत!

या मदतीतून राहाता तालुक्यातील शिर्डी येथील सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या गरजू व गरीब रुग्णांना आवश्यक मेडिकल साहित्य, रुग्णांना वाफेचे यंत्र, फळे, सकस आहार व गरजवंंत कुटुंबाला आवश्यक असलेला किराणा देण्याचा संकल्प सोडला आहे. खूप काही जास्त करता येईल असेही नाही पण या कोव्हिडच्या महामारीत थोडा का होईना सर्वसामान्यांना मदत करण्याच्या हेतूने प्राथमिक शिक्षक पुढे आले आहेत.

या जागतिक महामारीत अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. वेळीच उपचार न मिळाल्याने ही वेळ रुग्णांवर येत आहे. आपल्या छोट्याशा योगदानातून जर कुणाच्या चेहेर्‍यावरची काळजीची रेषा अस्पष्ट करू शकलो तर कुणाच्या पोटाच्या भुकेचा एक घास बनू शकलो तर... कुणाच्या समस्येवर थोड्या वेळाचा का होईना तोडगा होऊ शकलो तर... ही भावना आणि सामाजिक बांधिलकी जपत राहाता तालुक्यातील कृतीशील शिक्षक व सर्व संघटनांचे शिक्षक प्रतिनिधी एकत्र येत राहाता तालुक्यातील शासकीय कोव्हिड सेंटरमधील सर्वसामान्य रुग्णांना मदत करण्यासाठी राहाता तालुक्यातील प्राथमिक शिक्षक पुढे आले आहेत.

राहाता तालुक्यात 600 प्राथमिक शिक्षक आहेत. त्यातील किमान 500 तरी यात सहभागी होतील असा अंदाज आहे. प्रत्येकाने किमान 1100 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे या अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षकांनी हा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांत बर्‍यापैकी निधी गोळा झाला आहे. प्राथमिक शिक्षक यासाठी उत्साहाने या सामाजिक कार्यासाठी पुढे येत आहेत.

करोनाने बाधित झाल्यानंतर उपचारासाठी कोव्हिड सेंटरला अ‍ॅडमिट व्हावे लागते. पर्यायाने त्या रुग्णांच्या कुटुंबियांना होम क्वारंटाईन व्हावे लागते. यात काहींना दैनंदिन मजुरीवर आपला चरितार्थ चालावा लागतो. अशा कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसतो. याशिवाय अन्नधान्य टंचाई, दोन वेळच्या जेवणाची पंचाईत होऊ शकते. क्वारंटाईन सेंटरमध्ये फळे अथवा आवश्यक मेडिसीन उपलब्ध व्हावे म्हणून हे गुरुजन आपापल्यापरीने आर्थिक स्वरुपात मदत करत आहेत. हा गोळा झालेला निधी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्यामार्फत गरजुंना आवश्यक त्या साहित्यांसह अथवा औषधांसह या गरजू व गरीब रुग्णांना देण्यात येणार आहे. किराणाच्या स्वरुपातही कुटुंंबाला मदत होऊ शकते. या उपक्रमासाठी प्रांत, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी या प्राथमिक शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्राथमिक शिक्षक ऐच्छिकपणे आपले योगदान देत आहेत. 4-5 दिवसांत हा निधी गोळा होऊ शकतो.

उत्तरदायित्व म्हणून मदत !

माझा शिक्षक आपल्या कुटुंबाचा जसा विचार करतो तसा समाजाचा विचार करणारा आहे, अशी भावना राहाता पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांनी व्यक्त केली. आमचे शिक्षक हे सर्वसामान्य कोव्हिड रुग्णांसाठी योगदान देत आहेत ते प्रसिध्दीसाठी नाही. समाजाला मदत करणे हे आपले उत्तरदायित्व आहे, असे समजून मदत करत आहेत, असे मत ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाक्चौरे यांनी व्यक्त केले.

ऑक्सिजन कॉन्सट्रेटर संयंत्र घेणार

सध्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. हवेतील ऑक्सिजन घेऊन तो कोव्हिड रुग्णांना पुरवणारे यंत्र ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर संयंत्र खरेदी करून ते कोव्हिड सेंटरला द्या, अशी सूचना तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्राथमिक शिक्षकांना केले आहे. त्यावर प्राथमिक शिक्षकांनी सकारात्मकता दाखवत तयारी दर्शविली आहे, अशी माहिती ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com