
राहाता | तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्राला कन्फ्युजमध्ये ठेवणार्या शरद पवारांना पुतण्या अजित पवारांनी कन्फ्युजमध्ये ठेवले. त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललंय हे त्यांनाच माहित आहे, अशी टिप्पणी राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
राहाता तालुका प्रेस क्लबच्यावतीने ना. विखे पाटील यांची प्रकट मुलाखतीचे आयोजन प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकूलात आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रेस क्लबच्यावतीने राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, शिर्डी येथील दिपक निकम, राहाता मंडळाधिकारी मोहोसिन शेख यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांचा गौरव ना. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य इंद्रभान डांगे होते. डॉ. संतोष मैड, तहलिसदार अमोल मोरे, पालिकेचे मुख्याधिकारी आहेर, प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे आदींसह राहाता व कोपरगाव तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
ना. विखे पाटील यांनी वाळु, खडी, नगर-मनमाड रस्त्याची दुरावस्था, निळवंडे धरण, समन्यायी पाणी वाटप, शिर्डी विमानतळ, पश्चिम वाहिन्यांचे पाणी आणि राज्यातील स्थिती यावर भाष्य केले. प्रकट मुलाखतीत राज्यातील सध्याच्या घडामोडीवरही मार्मिक टिप्पणी केली.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मनात काय चाललंय? या प्रश्नाचे उत्तर देतांना ना. विखे पाटील म्हणाले, त्यांचे जे नेते आहेत शरद पवार ते राज्याला कन्फ्युज मध्ये ठेवतात. त्यांनाच आता अजित पवारांनी कन्फ्युज ठेवले. त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललंय कुणाला समजणार आहे.
मनातले मुख्यमंत्री फडणवीसच!
तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? या प्रश्नाला बगल देत ना. विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री ना. शिंदे, उपमुख्यमंत्री ना. फडणवीस चांगले काम करत आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री ना. अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला संधी दिली. देवेंद्र फडणीस तळागाळापर्यंत पोहचलेले नेते आहेत. तेच आपल्या आणि महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले आदर्श नेते आहेत. राज्यात राजकिय भुकंप होणार नसल्याचा विश्वास ना. विखे पाटील यांनी व्यक्त केला.
निळवंडेचे पाणी येईल!
निळवंडेच्या प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले, सुरुवातीला तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी दुरदृष्टी ठेवून या धरणाच्या कामाला सुरुवात केली. विखे पाटलांना श्रेय जाईल, चव्हाण साहेबांना श्रेय जाईल म्हणून जागा बदलली. धरणाची जागा बदलली कुणी हे सवार्ंना माहिती आहे. खासदार बाळासाहेब विखे पाटील कधी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नव्हते. नेतृत्व किती वर्ष महाराष्ट्राच्या जाणत्या राजाने केले. निळवंडेच्या आडून केवळ स्व. बाळासाहेब विखे पाटील यांना बदनाम करणे हा एकमेव धंदा त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पुढारी करत होते. वास्तविक युतीच्या काळात मोठा निधी या धरणाला मिळाला. पहिल्या 21 किमीचे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धरणातून पाणीच निघायला तयार नाही. पिंचड यांना आपण विनंती केली. देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केली. त्यामुळे 21 किमीचे काम पुणर्र् झाले. ते 21 किमी काम पुर्ण झाल्यावरच निळवंडेचे उजव्या व डावा कालवा सुरु होत आहे. ते काम आपण पुर्ण केले. हा प्रश्न प्रत्येकाच्या जिवनाशी भिडलेला होता.
समन्यायीच्या बिलावर सही कुणाची?
समन्यायी पाणी वाटपातून या जिल्ह्याचे पाणी खाली गेले. 2005 साली त्या खात्याचे राज्यमंत्री आपल्याच जिल्ह्यातले होते. त्यांनी त्या बिलावर सही केली. समन्यायी पाणी वाटपात निळवंडे, भंडारदरा आहे. उद्या एका बाजुला तुम्ही निळवंडेचे तारणहार व्हायला बघता, मोठ्या आशा दाखविता आणि त्या धरणाचे पाणी खाली निघून जाण्यासाठी समन्यायी पाणी वाटपाच्या बिलावर तुमच्या सह्या आहेत. हे का विसरता, असा सवाल आमदार थोरात यांनी विखे पाटील यांनी नाव घेता विचारला.
आयटी पार्क उभारणार
शिर्डी विमानतळाला नाईट लँडिंग सुरु झाली. हे विमानतळ हे या भागाचे ग्रोथ इंजिन राहिल. कारण शेती महामंडळाची 500 एकर जमीन सोनेवाडीला आहे. महसुल मंत्री म्हणून आपण त्याचे अध्यक्ष आहोत. बिझनेस पार्क तयार करण्यासाठी हाती घेतलेला आहे. कारण समृध्दी मार्ग खेटून जातोय. तेथे 100 एकरात आयटी पार्क करणार आहोत. लॉजिस्टीक पार्क करावा, शेती उद्योगासाठी कोल्ड स्टोरेज पासुन प्रक्रिया प्रोसेसिंग करण्याची युनिट सुरु करु. विमानतळाचा आयटी सेक्टरला फायदा होणार आहे. नोकर्या निर्माण करणे हे मोठे चॅलेंज आपल्याला भविष्यात आहे.
पंढरपूरला 2700 कोटी
आपण दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत. शिर्डी आणि पंढरपूर हे या जिल्ह्यात येणारे तिर्थक्षेत्र आहे. 2700 कोटी रुपयांचा पंढरपूर विकासाचा आराखडा मंजुर केला आहे. शिर्डीचा ही विकास होईल.
नगर मनमाड पुर्ण होईल
खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नाने नगर मनमाड रस्त्यासाठी मोठा निधी मंजुर झाला. 900 कोटी रुपये मंजुर झाले. हा रस्ता दिड वर्षात पुर्ण होईल. या रस्त्याच्या सर्व घडामोडी ना. विखे पाटील यांनी यावेळी कथन केल्या.
हायवे अन प्रवासी
आपण एकदा नगरला चाललो होतो. कोल्हारच्या पुलावर ट्रॉफिक जाम झाली. आपण पोलिस यंत्रणेच्या मार्फत आमची गाडी पुढे नेत एका एसटीच्या बाजुला आमची गाडी उभी राहिली. तर त्या एसटीतुन प्रवासी चर्चा करत होते. येथे कोण आमदार आहे? तो काय झोपा काढतो का? मी हे सर्व ऐकत होता. तुम्ही विचार करा, माझी काय अवस्था झाली असेल. परंतु मला एवढं वाईट वाटले की, आपला या गोष्टीशी दुरान्वये संबंध नाही. त्याची सर्व जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते, असे विखे पाटील म्हणाले.