राहाता पंचायत समितीला राज्यस्तरीय 4 लाखांचा पुरस्कार

राहाता पंचायत समितीला राज्यस्तरीय 4 लाखांचा पुरस्कार

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान स्पर्धेत राहाता पंचायत समितीला 4 लाख रुपयांचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

शासनाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहनपर परितोषिक देवून सन्मानित करण्यात येते. सन 2021-22 या वर्षात पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांचे केलेले निराकरण, कोविड संकटात केलेली मदत, महिला बचत गटाकरिता विक्री प्रदर्शन आणि घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशा स्तरावर मुल्यमापन करण्यात आले होते. राहाता पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करून समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सदैव कार्यरत असते.

कोविड संकटातही विविध विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी जीवावर उदार होऊन शासन नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी कोविड योध्दा बनून समाजासाठी केलेले काम खूपच महत्वपूर्ण ठरले. महिला बचत गटाकरिता पंचायत समितीच्या माध्यमातून सदैव वेगवेगळ्या उपक्रमातून सुरू असलेल्या प्रोत्साहनपर कामामुळे कोविड संकटातही महिला बचतगटांनी तालुक्यात मालाचे उत्पादन करून विविध प्रदर्शनातून त्याची विक्री केली आणि या चळवळीत वेगळेपण जपले.

लाभार्थींना घरकुल योजनेतून घर मिळावीत म्हणून प्रशासकीय स्तरावर गतिमानतेन पाठपुरावा केल्यामुळेच तालुक्यात या योजनांची यशस्वीता समोर आली. या सर्व मूल्यमापनात राहाता पंचायत समिती सरस ठरल्याने राज्यस्तरीय पातळीवर चार लाख रुपयांच्या पुरस्काराने गौरव झाला असल्याचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी सांगितले. पंचायत समितीच्या माध्यमातून परप्रांतीय कामगारांना श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या गावी सुखरूप पोहचविण्याचे यशस्वी काम झाले आणि कमी कालावधीमध्ये सर्वाधिक लसीकरण करण्यात पंचायत समितीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आ. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी महिला बचत गटाकरिता पंचायत समितीच्या माध्यमातून केलेल्या कामाचे वेगळेपण स्वयंसिध्दा या ब्रॅडनेमच्या माध्यमातून राज्यात नव्हे तर देशभर पोहचल्याने या कामाचा फायदा पंचायत समितीच्या प्रशासकीय कामाकरिता झाल्याचे शेवाळे म्हणाले.

पंचायत समितीला मिळालेल्या पुरस्काराबद्दल माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

राहाता तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून काम करताना पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये चांगला संवाद राहिल्याने योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे होते. प्रशासनातले दैनंदिन काम आणि संकट म्हणून येणार्‍या प्रत्येक आव्हानाला तोंड देऊन अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी केलेल्या कामाचे प्रतिबिंब या पुरस्कारात असल्याचे शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या.

Related Stories

No stories found.