राहाता पालिकेच्या भूमिगत गटार कामास विरोध

राहाता पालिकेच्या भूमिगत गटार कामास विरोध

महिलांचा आक्रमक पवित्रा, काम केल्यास आंदोलन : नगरसेविका सोळंकी

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता शहरातील विशालनगर भागात आधीपासूनच भूमिगत गटार असताना पालिका आणखी एक भूमिगत गटार बनवण्याच्या तयारीत आहे. या नवीन भूमिगत गटारीचा भविष्यात काहीच उपयोग होणार नसून उलट शासनाच्या पैशांचा अपव्यय होणार असल्याने आम्हाला ही भूमिगत गटार नको, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली. प्रभागाच्या नगरसेविका निलम सोळंकी यांच्या नेतृत्वात स्थानिक महिलांनी नगरपालिका प्रशासनाला याबाबत निवेदन दिले.

विशालनगर भागात चौधरी यांच्या घरापासून सदाफळ यांच्या घरापर्यंत असणार्‍या रस्त्यावरील घरांचे बाथरूम हे मागच्या बाजूस आहे. त्या ठिकाणी जुना रस्ता आणि भूमिगत गटार आधीपासूनच अस्तित्वात आहे. त्यामुळे पालिका नव्याने आमच्या घरासमोर बनवत असलेल्या भूमिगत गटारीचे काम त्वरित बंद करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली. नगरपालिका प्रशासना विरोधात महिलांमध्ये मोठा रोष दिसून आला. त्वरित गटारीचे काम थांबवावे अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महिलांनी दिला आहे.

दरम्यान उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे हे नगरपालिका कार्यालयात जात असताना महिलांनी त्यांनाही निवेदन देत सदर गटारीचे काम करू नये, अशी मागणी केली. पठारे यांनी सदर कामासंदर्भात पालिकेच्या सभेत अगोदरच विरोध दर्शवल्याचे सांगितले. मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांचेकडे पुन्हा पाठपुरावा करू. जनतेचा विरोध असेल तर काम न करणेच योग्य असल्याचे मत व्यक्त केले.

निवेदनावर नगरसेविका निलम सोळंकी, सुनंदा राने, राधिका बकरे, शिला कदम, लक्ष्मी मिसाळ या महिलांसह दीपक सोळंकी, सुनील भोसले, महेश चौधरी, उमेश निमसे, संजय सदाफळ, विजय सदाफळ, अमोल आंग्रे, संदीप धिवर, इरफान पठाण, गणेश खांडरे, सुरज कोळगे, फ्रान्सिस भारूड, आनंदा भारूड, सागर आत्रे आदींच्या सह्या आहेत.

मागे एक गटार आता पुढेही दुसरी गटार करण्याची गरज काय? पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनजवळच ही गटार केली जात आहे. त्यामुळे भविष्यात दूषित पिण्याचे पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमचा त्यास विरोध आहे.

- जयश्री सदाफळ, महिला

अगोदर एक भूमिगत गटार असताना दुसरी गटार करणे म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. कामही निकृष्ठ दर्जाचे आहे. फुटलेले पाईप टाकून रोगराईला आमंत्रण देण्याचा किळसवाणा प्रकार सुरू आहे. प्रभागातील नागरिकांना काम मान्य नाही ते करू नये अन्यथा आंदोलन करू.

- निलम सोळंकी, नगरसेविका

जी जुनी भूमिगत गटार आहे त्यातच सुधारणा करावी. नविन गटारीमुळे प्रभागातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.

- मंदाकिनी बोरूडे, महिला

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com