राहाता पालिकेचे स्वच्छ सर्व्हेक्षणाचे साहित्य काही मिनिटात गायब

चौकशीची जिल्हाधिकारी यांच्याकडे साहेबराव निधाणे यांची मागणी
राहाता पालिकेचे स्वच्छ सर्व्हेक्षणाचे साहित्य काही मिनिटात गायब

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता नगरपालिकेचे भारत स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानाचे हजारो रूपयांचे साहित्य सुलभ शौचालयातून काही मिनिटात गायब होते

कसे याची जिल्हाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

राहाता शहरात गेल्या महिनाभरापासून भारत स्वच्छ अभियानाची जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील मुख्य रस्ता, नगरपालीका इमारत तसेच शहरातील सर्व शौचालये रंगीबेरंगी चित्र व सुचनांनी सजवण्यात आली. लाखो रूपये या अभियानावर खर्च केला जात असून हा केवळ देखावा पालीका प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप निधाणे यांनी केला आहे.

केवळ फोटोशेषन करून हे स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान कागदावरच दाखविले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारने या अभियानासाठी जे नियम व अटी लावल्या आहेत त्या केवळ फोटोशेषन करून तात्पुरत्या स्वरूपात निर्मीत केल्या जात आहे. जिल्हा व राज्य पातळीवरील पथक पाहणी करण्यापुरते हे दाखविले जात असून ही जनतेच्या व सरकारच्या डोळ्यात धुळ फेक केली जात आहे.

या अभियाना अंतर्गत शौचालयास अधिक मानांकन असल्याने त्यावर अधिक भर पालिकेकडून दिला जात आहे. शुक्रवारी पथक तपासणीसाठी आले असता पालिकेने शहरातील शौचालय नविन वास्तूसारखे सुशोभीत केले. यात शौचालयात आरसे, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीनचे मशीन, डस्टबीन, पाण्यासाठी बादल्या, सँटेटायझरचा ड्रम, हात धोन्यासाठी साबन व डेटाल हे साहीत्य ठेवले.

दरवाजासमोर देशी-विदेशी झाडांच्या कुंड्या ठेवण्यात येऊन पथकासोबत या सर्व वस्तूंचे फोटोशेषन केले. या कालावधीत कोणालाही शौचास जाण्यास परवानगी दिली नाही. पथक बाहेर पडताच हे सर्व साहित्य आरोग्य कर्मचार्‍यांनी तातडीने सोबत घेऊन दुसर्‍या शौचालयात नेवून सजविले. याचे सर्वच ठिकाणी नागरिकांनी फोटो व व्हीडीओ काढून सोशल मिडीयावर टाकले. काही नगरसेवकांनी येथे येवून पालिकेचा सुरू असलेला हा धुळफेकीचा प्रकार पाहून तिव्र नाराजी व्यक्त केली.

सरकारच्या चांगल्या अभियानाचा राहाता पालिका फज्जा उडवत असून या अभियानावर केवळ देखावा करून अनुदान लाटून निधीचा अपहार करण्याचा प्रकार सुरू असून अनेक शौचालयांना पाण्याच्या टाक्या नसताना नविन पाईपलाईन बसवून सर्व व्यवस्थित असल्याचे दाखविले जात असून पाहनी पथक हे सर्व उघड्या डोळ्याने पाहून पुढे जात आहे. दैनंदिन स्वच्छता जशी होती तशीच सुरू आहे.

कोणताही बदल झाला नाही. घनकचर्‍याची मोठी दुर्दशा झाली. तिथे सुधारणा नाही. केवळ फोटोशेषन करून हे अभियान कागदोपत्री दाखविले जाऊन यामधे सरकारी निधीचा गैरवापर सुरु असून स्वतः जिल्हाधिकारी यांनी या अभियानाची पाहणी करावी, अशी मागणी निधाणे यांनी केली आहे.

मागील वर्षी अभियानात केलेल्या कॉर्नर बगीचा गायब

मागील वर्षी याच अभियानात राहाता शहरात सहा ते सात ठिकाणी पालीकेने कॉर्नर गार्डनची निर्मीती केली. देशी-विदेशी झाडे बसविली. यावर लाखो रूपये खर्च केले. मात्र या बगीचातील एक झाड किंवा एक विटही या ठिकाणी पाहावयास मिळत नसल्याचे तक्रारीत म्हटले असून या सर्व प्रकाराची चौकशी करून पालिकेच्या बनवाबनवी व पाहणी पथकातील अधिकार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकही करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com