राहाता नगरपंचायतीने गुन्हा मागे घ्यावा

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची मागणी
राहाता नगरपंचायतीने गुन्हा मागे घ्यावा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राहाता नगरपरिषदेने चुकीच्या धोरणांचा अवलंब करत सुडभावनेतून शहरातील सार्वमतचे पत्रकार संकेत सदाफळ यांच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.

तहसीलदार कुंदन हिरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड काळात पत्रकार राज्य व केंद्र सरकार, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करत आहे. असे असताना राहाता नगरपंचायतचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण तसेच कार्यालयीन अधिकारी नवनाथ जगताप यांनी संकेत सदाफळ यांच्यावर कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

यापुर्वीही शिर्डीतील पत्रकारांवर संचारबंदी काळात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनेचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राहाता तालुका यांच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त केला. तात्काळ गुन्हा पाठीमागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजकुमार जाधव, राहाता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, उपाध्यक्ष दिलीप खरात, शिर्डी प्रेस क्लबचे मनोज गाडेकर, सुनील दवंगे, सचिन बनसोडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अनिल भांबारे, विनोद जवरे, आप्पासाहेब वाणी, राहुल कोळगे, राहुल फुंदे, सचिन गव्हाणे, निलेश रोकडे आदींसह पत्रकार उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com