
राहाता |वार्ताहर| Rahata
येथील नगरपरिषदेचे कंत्राटी कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून वेतनाढीच्या प्रतिक्षेत आहेत. संबंधित ठेकेदाराकडून वेतनवाढ मिळावी यासाठी कंत्राटी कर्मचार्यांनी प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून राहाता नगरपरिषदेच्या कंत्राटी कर्मचार्यांना ठेकेदाराकडून मिळत असलेली 255 प्रति दिन रकमेची तुटपुंजी रक्कम सध्याच्या महागाईचा विचार करता कुटुंबाची उपजीविका चालवण्यासाठी अतिशय कमी आहे.
ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासूनचा कायम असलेल्या कर्मचार्यांना 5 व 6 वा वेतन आयोगाचा फरक, महागाई भत्ता फरक प्रशासक चव्हाण यांनी कर्मचार्यांना देऊन क्रांतिकारी निर्णय घेतला. त्याच पद्धतीने पुढाकार घेऊन कंत्राटी कर्मचार्यांचे वेतन वाढीसाठीआपण प्रयत्न करावे.
राहाता नगरपरिषदेच्या जवळपास 80 ते 90 कंत्राटी कर्मचारी नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा तात्काळ मिळावी व विविध विभागाचे कामकाज सुरळीत चालावे व जलदगतीने व्हावे याकरिता नगरपरिषदेने विविध विभागांत या कंत्राटी कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे.
सदर नियुक्त केलेल्या कंत्रााटी कर्मचार्यांचा ठेका नाशिक येथील सह्याद्री व धुळे-जळगाव येथील सावित्रीमाई सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थेने घेतला आहे. या ठेका घेतलेल्या संस्थेकडून येथील कंत्राटी कर्मचार्यांना प्रतिदिन अवघे 255 रुपये वेतन मिळत असल्याने महिन्याकाठी 7500 एवढेच तुटपुंजी रक्कम मिळते. परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला वेतनात वाढ मिळेल या अपेक्षेने कर्मचारी अत्यंत कमी वेतनात काम करीत आहेत. परंतु अनेक वर्षे काम करूनही वेतनात कुठल्याही प्रकारची वाढ होत नसल्याने अनेक कंत्राटी कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
करोना काळात शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आपल्या कुटुंबाची तसेच वेळेची पर्वा न करता कंत्राटी कर्मचार्यांनी करोना संकटाचा सामना करत नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचे काम केले आहे.
राहाता नगरपरिषदेत आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा, अग्निशामक विभाग, तसेच प्रशासकीय विभाग याठिकाणी जवळपास 90 कंत्राटी कर्मचारी काम बघतात. या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन आपण संबंधित ठेकेदारांना कंत्राटी कर्मचार्यांचे वेतन वाढवण्यासाठी सूचना कराव्यात, असे लेखी निवेदन कंत्राटी कर्मचार्यांनी प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांना दिले आहे.
या निवेदनावर पांडुरंग बनसोडे, राजेंद्र पवार, सागर कासार, अनिल थोरात, अमोल बनसोडे, प्रफुल्ल निकाळे, अमोल बनकर, संदीप सदाफळ, प्रवीण नन्नवरे, अभिषेक कुराडे, योगेश सुरासे, सचिन गाढवे, राजेंद्र गुंजाळ, प्रमोद बनकर, आनंद लोंढे, गोरक्ष साळवे, तुषार शिंदे, बाळा सदाफळ, संतोष शिंदे, संदीप शिंदे, कृष्णा कुराडे, दीपक आरणे, वैभव लाहारे, प्रभाकर नावकर यांच्यासह असंख्य कंत्राटी कर्मचार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.