राहाता नगरपरिषद प्रशासक म्हणून मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण

प्रशासक राज कसा कारभार करतील याची नागरिकांना उत्सुकता
राहाता नगरपरिषद प्रशासक म्हणून मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण

राहाता |वार्ताहर| Rahata

नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 29 डिसेंबरला पूर्ण झाल्याने नवीन पदाधिकार्‍यांची निवड होईपर्यंत राज्य शासनाने राहाता नगरपरिषदेच्या कामकाज पहाण्यासाठी प्रशासक म्हणून मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांची नियुक्ती केली आहे.

संपूर्ण राज्यात नगरपरिषद व नगरपंचायती पदाधिकारी यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नवीन पदाधिकारी यांची निवड होईपर्यंत राज्य शासनाने प्रत्येक या ठिकाणी प्रशासक म्हणून प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना प्रशासक म्हणून कामकाज पाहण्यासाठी नियुक्ती दिली असल्यामुळे शासकीय अधिकारी यांना एकहाती कारभार पाहता येणार आहे. नगरपरिषदमध्ये मुख्याधिकारी यांना शहराचा कारभार करत असताना पालिकेत निवडून आलेले सत्ताधारी व विरोधी गटाची मनधरणी करून कामकाज पाहावे लागते. अनेकदा नगराध्यक्षांच्या दबावाखाली काम करावे लागते. त्यामुळे बहुतांशी नगरपरिषद येथे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांचे सुत जमत नसल्याचे चित्र बघायला मिळते.

शहरातील नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना घेतलेला निर्णय सत्ताधारी किंवा विरोधी गटाला मान्य होत नाही. परिणामी राजकीय मंडळींच्या हेवे-दाव्याचे निरसन करण्यास वेळ द्यावा लागतो. शहरातील विरोधी व सत्ताधारी यांच्या कैचीत शासकीय अधिकारी सापडले जातात. असे असले तरी शासकीय अधिकारी यांच्यावर अंकुश असावा म्हणून राज्य शासनाने नगराध्यक्षांना विशेष अधिकार दिले असल्याने शहराची महत्वाची विकासाची भूमिका बजावण्यासाठी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष हे दोन चाके महत्वाची समजली जातात. या दोघांचा निर्णय शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या दोन पदांना विशेष महत्त्व आहे.

सध्या राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्यावरून सर्वच ठिकाणी निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. उच्च न्यायालयाने राजकीय ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने राजकीय आरक्षणाचा अभ्यास करून संपूर्ण बाबी तपासूनच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात यावा, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी घेतल्याने नगरपंचायत व नगरपरिषद डिसेंबरमध्ये होणारी निवडणूक चार ते पाच महिने पुढे जाण्याची शक्यता आहे. सध्या संपूर्ण देशात ओमिक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन निवडणुकामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने निवडणुका लांबणीवर घेण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राहाता नगरपंचायत येथे नियुक्त केलेले प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांना 4 ते 5 महिने प्रशासक म्हणून काम पाहावे लागणार असल्याने राहाता नगरपंचायतमध्ये प्रशासक राज कसा कारभार करतील याची नागरिकांना उत्सुकता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com