राहाता पालिकेची औषध फवारणी श्रेयवादावरून चर्चेत

राहाता पालिकेची औषध फवारणी श्रेयवादावरून चर्चेत

राहाता (तालुका प्रतिनिधी) -

राहाता नगरपालिकेची औषध फवारणी सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांच्या श्रेयवादामुळे व फलकबाजीमुळे नागरिकांमध्ये

मोठा चर्चेचा विषय ठरली आहे.

राहाता शहरात मोठ्या प्रमाणावर करोनाचा कहर सुरू असताना अनेकांचे बळी या करोनामुळे गेल्यावर पालिकेला करोनावर प्रतिबंध करण्यासाठी जाग आली. त्यानंतर पालिकेने राहाता शहर सात दिवसांसाठी लॉकडाऊन केले. अनेक दिवसांची नागरिकांनी व काही नगरसेवकांनी मागणी करूनही शहरात औषध फवारणी केली जात नव्हती ती लॉकडाऊननंतर सुरू करण्यात आली. अवघ्या एका ट्रॅक्टरद्वारे ही फवारणी सुरू केली खरी मात्र ती आमच्यामुळेच सुरू झाली याचे श्रेय घेण्याची स्पर्धा पहिल्या दिवसापासून सुरू झाल्याचे शहरवासीयांना पहावयास मिळत आहे.

पहिल्याच दिवशी या फवारणीचा शुभारंभ शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे व आरोग्य सभापती विजय सदाफळ यांनी केला. तेव्हापासून दोन दिवस पठारे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या फवारणीचा ताबा घेत प्रभागात सोबत जाऊन औषध फवारणी करताना दिसत होते. सोशल मिडीयावर याची मोठी प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न केला गेला. याचे श्रेय विरोधकांना जाऊ नये यासाठी तिसर्‍या दिवशी नगराध्यक्षा ममता पिपाडा त्यांचे पती राजेंद्र पिपाडा, सभापती विजय सदाफळ यांनी सुरू असलेल्या फवारणीच्या ठिकाणी जाऊन फवारणी करणार्‍या ट्रॅक्टरला समोरच्या बाजूने नगराध्यक्षांचा मोठा बॅनर असलेला फोटो लावून फोटोसेशन केले व ही फवारणी नगराध्यक्षा हेच करत असल्याचे दाखवून दिले .याचेही फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने हा शहरातील नागरिकांसाठी पदाधिकार्‍यांमधे सुरू असलेला श्रेयवाद हा चर्चेचा विषय बनला आहे.

पालिकेच्या औषध फवारणीचे कोणी श्रेय लाटू नये. नागरिक करोना आजारामुळे त्रस्त झाले असून महिनाभरापासून अनेक नगरसेवक तातडीने औषध फवारणीची मागणी करत असताना मुख्याधिकारी व सत्ताधारी यांनी डोळेझाक केली. तीन दिवसांपूर्वी शहरात फवारणी सुरू केली. तीही एका मशीनद्रारे केली असून ही फवारणी कासवाच्या गतीने सुरू आहे. संपूर्ण शहर व वाड्या वस्त्यांवर फवारणी करण्यास आणखी दहा दिवस जातील. पालिकेने एकाच वेळी संपूर्ण शहर व वाड्या वस्त्यांवर फवारणी करून करोनामुळे त्रस्त झालेल्यांना मदतीचा हात देण्याऐवजी श्रेयवाद घेणे योग्य नसून प्रत्येक वॉर्डातील नगरसेवक औषध फवारणीस सक्षम आहेत. सत्ताधार्‍यांनी काळजी करू नये, अशी भावना नगरसेविका निलमताई सोळंकी यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com