राहाता : विशेष सभेला अवघा एक नगरसेवक हजर!

एकाच आठवड्यात दोनदा सभा तहकूब करण्याची पहिलीच घटना
राहाता : विशेष सभेला अवघा एक नगरसेवक हजर!

राहाता |वार्ताहर| Rahata

राहाता नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेला 19 पैकी 18 नगरसेवक गैरहजर राहिल्याने पीठासीन अधिकारी ममता पिपाडा यांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय दिला असून एकाच आठवड्यात दुसर्‍यांदा सभा तहकूब वेळ नगराध्यक्ष यांच्यावर आल्याने नगरपालिका इतिहासात सभा तहकूब करण्याची ही पहिलीच घटना आहे. राहाता शहरात नगरपरिषदेची सभा तहकूब करण्यावरुन गेल्या आठवड्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने शहरात राजकीय धूळवड सुरू झाल्याने येणारी नगरपरिषदेची निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही. नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा यांनी 17 डिसेंबर रोजी राहाता नगरपरिषदेची नगरसेवकांची विशेष सर्वसाधारण सभा ठेवली होती. या सभेत अहिंसा स्तंभ जागा निश्चित करणे व शहरातील विविध रस्ते ,चौक नगरपरिषद सभागृह, प्रवेशद्वार यांना नाव देणे हा विषय अजेंडा मध्ये घेण्यात आला होता. परंतु अजेंडात घेण्यात आलेल्या रस्ते ,चौक नगरपरिषद प्रवेशद्वार सभाग्रह यांना कोणाचे नाव द्यायचे याची कल्पना नगरसेवकांना देण्यात आली नाही. आहिसा स्तंभा वरून शहरात जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून राहाता नगरपरिषदेच्या 17 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेला 19 पैकी 16 नगरसेवकांनी गैरहजेरी लावली होती.

अवघे दोन नगरसेवक या सभेला हजर असल्यामुळे पीठासीन अधिकारी ममता पिपाडा यांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेऊन सभा 23 डिसेंबर रोजी पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपचे नगरसेवक सभेला गैरहजर राहिले हि बातमी आ. विखे-पाटील यांना समजताच त्यांनी नगर येथे नगरसेवकांची बैठक घेऊन 23 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेसाठी हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या.

आ. विखे पाटील हे सभेला जाण्यासाठी दबाव टाकतील म्हणून भाजप व आ. विखे पाटील गटातील 15 नगरसेवकांनी 23 डिसेंबर रोजी होणार्‍या विशेष सर्वसाधारण सभेत अगोदरच सहलीला जाणे पसंत केले. त्यामुळे गुरुवारी होणार्‍या विशेष सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गुरुवारी आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेची वेळ 10.30 होती परंतु या सभेला 19 पैकी 18 नगरसेवक गैरहजर राहिले. फक्त डॉ. राजेंद्र पिपाडा हे या सभेला हजर असल्याने पीठासीन अधिकारी ममता पिपाडा यांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला.

राहाता नगरपालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाल सोमवार दिनांक 27 डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे. शनिवार व रविवार शासकीय सुट्टी असल्याने सभा घेण्यासाठी शुक्रवार व सोमवार हे 2 दिवस शिल्लक राहिल्याने. सहलीला गेलेले नगरसेवक सभेसाठी उपस्थित राहतील का ? सभा रद्द करावी लागेल अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, लोकनेते गोपीनाथ मुंडे, या महापुरुषांचे नाव देण्यासाठी आमचे विरोधक विरोध करत आहे हे सर्व जनतेच्या लक्षात आले आहे. सर्वसामान्य जनतेच्या हृदयात आमची जागा आहे. सामान्य जनतेशी आमचा विश्वास याचे अतूट नाते आहे. नगरसेवक पळवून नेणे हे आमच्यासाठी नवीन नाही. यापूर्वीही असे प्रयोग झाले आहेत. राष्ट्रपुरुष व देश पातळीवरच्या नेत्यांची नावे देण्यासाठी सर्वसाधारण सभेला गैरहजर राहून नगरसेवक सहलीला निघून गेले त्यामुळे जनतेमध्ये संतप्त भावना आहे. आजच्या सर्वसाधारण सभेत कोरम पूर्ण नसल्यामुळे सभा तहकूब केली. आमच्या विरोधकांनी विरोध करूनही आम्ही विकास करून दाखविला व 10 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. आमच्या विरोधात नगरसेवकांना भूमिका घ्यायला लावणे हे काय आम्हाला नवीन नाही. त्यामुळे आम्ही सामान्य जनतेशी थेट संपर्क ठेवतो. त्यांनी सांगितलेली कामे प्रामाणिक करतो व सामान्य जनतेच्या आशीर्वादाने आम्ही नगराध्यक्ष राहिलो. सामान्य जनता उघड्या डोळ्याने काय चालले आहे हे पहात आहे.

- नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा ,राहाता

शहरात महापुरुषांचे नाव देऊन राजकारण करायचे काम सुरु आहे. नाव द्यायचे होते तर या अगोदर का दिले नाही. कार्यकाळ संपण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले असताना नाव देण्याचा अट्टाहास का. चौकात आहिस्ता स्तंभ उभा करण्यावरून मुस्लिम समाजावर अन्याय झाला आहे. अहिंसा स्तंभाच्या मुद्द्यावरून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

- सलीम शहा, नगरसेवक राहाता

संख्याबळ कमी असल्यामुळे सभा सुरू करताच येत नाही , त्यामुळे तहकूब करण्याचा प्रश्न नाही. सभा नियमाप्रमाणे रद्द करायला पाहिजे. पिपाडा यांना जनतेने एकहाती सत्ता दिली परंतु त्यांनी जनतेसाठी कुठलीही विकास कामे केली नाही. त्यांच्या गटाकडून निवडून आलेले नगरसेवकांना त्यांनी चांगली वागणूक दिली नाही म्हणून आज ते एकटे पडले आहे.

- राजेंद्र पठारे उपनगराध्यक्ष राहाता

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com